शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) बसला सोमवारी सायंकाळी शहरातील चांदणी चौक परिसरात आग लागून अंशत: जळून खाक झाली. चालकाने आग लागल्याची माहिती दिल्यानंतर प्रवाशी वेळेत बसमधून खाली उतरल्यामुळे सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुणे अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सीएनजीवर धावणाऱ्या पीएमपीएमएल बसला सायंकाळी ७.३० च्या सुमारास आग लागली. ही घटना भूगाव रोडवर चांदणी चौकाजवळ घडली. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तैनात करण्यात आल्या.
अग्निशमन अधिकारी गजानन पातुर्डकर म्हणाले, “आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा बसचा वरचा भाग आगीत जळून खाक झाला होता. आम्ही काही मिनिटांत आग आटोक्यात आणली आणि त्यानंतर दुय्यम आग लागू नये म्हणून पाण्याचा फवारा मारून कुलिंग ऑपरेशन केले. आगीत बसमधील आतील सीट जळून खाक झाली असून उर्वरित भागाचे कमी नुकसान झाले आहे. बसला आग लागल्याने आणि अग्निशमन दलाच्या कारवाईमुळे भूगाव रस्त्यावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला परंतु आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.