शबनम न्युज | सातारा
प्रतिनिधी : दिलीप सोनकांबळे
कूपर कॉलनी येथे स्कोडा आणि दुचाकीच्या गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात वसीम मुबारक कलाल हा युवक ठार झाला या युवकाचा बळी स्कोडा चालकाच्या बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे गेला असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी करत त्याचे पार्थिव शुक्रवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर ठेवल्याने एकच तणाव निर्माण झाला होता. मृताच्या नातेवाईकांनी कारचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांना चांगले धारेवर धरले.
याबाबतची अधिक माहिती अशी, कूपर कॉलनी परिसरात गुरुवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान वसीम कलाल हा दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कोडा चालकाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये वसीम गाडी बरोबर फरपटत जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती कलाल याच्या नातेवाईकांनी दिली. यासंदर्भात संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पार्थिव थेट अंतिम विधीसाठी नेण्याऐवजी ते थेट शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवल्याने एकच तणाव निर्माण झाला होता.
यावेळी पोलीस आणि मृताचे नातेवाईक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. पोलिसांनी संबंधित कारचालकावर कारवाई करतो असे आश्वासन दिले तरी बराच वेळ नातेवाईकांचे समाधान होत नव्हते. संबंधित कारचालक हा मद्यप्राशन केलेला होता. त्याच्या चुकीच्या गाडी चालवण्यामुळेच आमच्या नातेवाईकाचा बळी गेल्याचा आरोप संबंधितांनी केला. या प्रकरणात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी लक्ष घालून संबंधित जमावाला शांत केले आणि स्कोडा चालकावर कठोर कारवाई केली जाईल त्याची काळजी करू नये, असे आश्वासन दिले त्यामुळे तणाव निवळला. त्यानंतर नातेवाईक मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेवून गेले.