शबनम न्युज | चिखली
मेट्रोच्या सुरक्षा व्यवस्थापकाला फोन करून धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगत पैशाची मागणी केली. तसेच शिवीगाळ करत दम दिला. ही घटना शुक्रवार (दि. ९) रोजी घडली. या प्रकरणी शिवदास साधू चिलवंत (वय ४१, रा.घरकुल चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार फोन करणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मेट्रोच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या खाजगी एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांना गुरुवारी सायंकाळी चार वाजता एक अज्ञात व्यक्तीचा फोन आला व या फोनवर त्याने आपण धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलत असून, पैशांची मागणी केली. कोणीतरी चेष्टा करत असल्याचे फिर्यादीला वाटले, त्यामुळे त्यांनी या अज्ञात व्यक्तीच्या फोनला दुर्लक्ष केले. परंतु शुक्रवारी सकाळी ८ : १५ ला परत त्याच व्यक्तीचा फोन आला व “आताच्या-आता धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात पैसे घेऊन ये”, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन फिर्यादी शिवदास चिलवंत यांनी चिखली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास चिखली पोलीस करीत आहे.