शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने शहरातील पत्रकारांसाठी अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्या असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. सदर शिबीर हे दि. २४ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे.
प्रसिद्धिपत्रकात म्हंटले आहे कि, मागील चार वर्षापासून महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीराचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात येऊन सुमारे ६० ते ७० हजार रुग्ण विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेत आहे. यंदाच्या वर्षीही शहरातील सर्व गोर गरिब रुग्णांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चिकित्साकरिता शनिवार दि. २४ डिसेंबर ते रविवार दि. २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत PWD ग्राऊंड, सांगवी येथे मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
सदर महाआरोग्य शिबिरामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड येथून सर्व शासकीय रुग्णालय व खाजगी नामंकित रुग्णालय सहभागी होणार असून शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्याच्या संबंधित तपासण्या व शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे.
समाजाच्या व्यथा व वेदना तसेच वस्तुस्थिती मांडण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या पत्रकार बांधवांना भेडसावणाऱ्या अनेक शारीरिक व्याधी व त्यावरील खर्चिक उपचार इत्यादी अडचणी लक्षात घेता सदर महाआरोग्य शिबिरातील आरोग्य सुविधांचा सर्व पत्रकार बांधवांनी व त्यांच्या कुटुंबियांनी तसेच आपल्या कार्यालयातील इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हि आयोजकांवतीने करण्यात आले आहे.