नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत केली मागणी
पिंपरी चिंचवड : (शबनम न्यूज प्रतिनिधी)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील रेडझोन क्षेत्राचे नकाशे व सर्व्हेची माहिती प्रसिद्ध करावी अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या सुलभाताई उबाळे यांनी मनपा
आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे त्यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये संरक्षण क्षेत्र म्हणजेच रेडझोन ची हद्द काही ठिकाणी आहे. त्यामुळे ह्या हद्दीमध्ये सामान्य नागरिकांना सुखसोयी मिळत नाहीत तसेच मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेता येत नाही, जमीन विकसित करता येत नाही,जुने बांधकाम असेल तर त्याचा पुनर्विकास सुद्धा करता येत नाही. तसेच घरांची विक्री सुद्धा करता येत नाही. ह्या असंख्य समस्या सामान्य नागरिकांना भेडसावत आहेत.
तसेच रेडझोन बाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. यामध्ये कोणते क्षेत्र हे रेडझोन हद्दीमध्ये येते ह्याची नागरिकांना पुरेशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.. त्यामुळे आम्ही शिवसेना, युवासेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने विनंती करतो कि, आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील रेडझोन हद्दीबाबत सर्व्हे क्रमांक तसेच प्लॉट क्रमांकानुसार नकाशे आणि रेडझोनची हद्द नव्याने लवकरात लवकर प्रसिद्ध करावी तसेच सामान्य नागरिकाची होणारी फसवणूक थांबण्यास अटकाव होईल ह्यामुळे यमुनानगर, त्रिवेणीनगर, रुपीनगर, मोरेवस्ती भागातील नागरिकांचे रेडझोन विषयी असलेले संभ्रम दूर होण्यास मदत होईल.
तरी रेड झोन क्षेत्र असलेले परिसर मनपा वतीने प्रसिद्ध करावे अशी मागणी शिवसेना नेत्या सुलभाताई उबाळे यांनी केली आहे.