दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांना त्यांच्या आगामी चित्रपट ‘वेड’ साठी शुभेच्छा दिल्या आहेत. नागराज मंजुळेंनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत या चित्रपटासाठी संगीत देणाऱ्या अजय अतुल यांचे कौतुक देखील केले आहे. ‘रितेशचे दिग्दर्शनातील पदार्पण हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक पाऊल पुढे टाकणारे ठरेल,’ अशी इच्छा नागराज मंजुळेंनी व्यक्त केली.
“मित्रांचा सिनेमा येतोय 30 डिसेंबरला. नेहमी प्रमाणे अजय-अतुल यांचं श्रवणीय अफलातून संगीत, रितेश यांचा पहिला दिग्दर्शकीय प्रयत्न मराठी चित्रपटासाठी पुढचं पाऊल ठरावं या मनःपूर्वक सदिच्छा !” तसेच ‘वेड’ च्या नावानं चांगभलं ! अशा संदेशात नागराज मंजुळे यांनी फेसबुकवर शुभेच्छा दिल्या.
नागराज मंजुळे यांच्या प्रॉडक्शन हाऊस ‘आटपाट प्रॉडक्शन’ने ‘घाट बंदुक बिर्याणी’ या अॅक्शन थ्रिलरची घोषणा केली आहे. ज्यात मंजुळे व्यतिरिक्त आकाश ठोसर आणि सयाजी शिंदे यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत आवताडे यांनी केले आहे. चित्रपटाचा टीझर ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि चित्रपटप्रेमींमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.