शबनम न्युज | मुंबई
“शुद्ध असं काही नसतं. शुद्ध ही संकल्पनाच अत्यंत फालतू आहे. माझी भाषा ही माझी आहे. त्यामुळं शुद्ध, अशुद्ध असं काही नसतं. मुळात जगभरात कुठंही अशुद्ध भाषा हा प्रकारच नसतो,” असं मत दिगदर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. नागराज मंजुळे हे नेहमी त्यांच्या साधे पणामुळे ओळखले जातात. त्यांचा राहणीमान, त्यांची बोली भाषा साधी दिसते आणि याच साधेपणामुळे ते ओळखले जातात. आता भाषा या विषयावरही नागराज यांनी तितक्याच परखडपणे आपलं मत मांडलं आहे.
ते म्हणाले, “माझ्यासारख्या खेड्यातील दगड फोडणाऱ्याच्या मुलाला मी काही तरी करू शकतो, या आत्मविश्वासानं मला इथपर्यंत आणलं,” असेही नागराज यांनी म्हटले. तर, भाषेची शुद्धता आणि सुंदरता यावरही परखडपणे आपले विचार मांडले.
‘तुझं दिसणं, तुझं जगणं यावर मात कशी केलीस?’, असा प्रश्न नागराजला या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावरही त्याने भूतकाळातील आठवणी सांगत परखडपणे विचार मांडले. ‘लहानपणी मलाही माझ्या दिसण्यावरून न्यूनगंड होता. पण आता तो नाही. सौंदर्य ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सौंदर्याची व्याख्या खरं तर मला अलीकडंच कळू लागली. गोरेपणा म्हणजे सौंदर्य नव्हे. साधी-साधी दिसणारी माणसंही मला सुंदर वाटतात. काहीच काम न करणाऱ्या हातांपेक्षा राबणारे हात मला सुंदर वाटतात’, असं उत्तर नागराजने दिलं. त्यावर, उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याला दाद दिली.