मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया
शबनम न्युज | पुणे
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार कि निवडणूक होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्व. आमदार मुक्ता टिळक आणि स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर आता पोटनिवडणुकीत त्यांच्या कुटुंबातूनच उमेदवार घोषित करून बिनविरोध निवडणूक होईल कि इतर पक्ष उमेदवार घोषित करतील, यावर सध्यातरी प्रश्न चिन्ह आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “महाराष्ट्रात अशी परंपरा आहे की एखाद्या विद्यमान आमदाराचा मृत्यू झाला आणि त्याच्या जवळच्या व्यक्तीला त्याच पक्षाने उमेदवारी दिली, तर प्रतिस्पर्धी पक्ष उमेदवार देत नाहीत. गेल्या वर्षी झालेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतही आम्ही असेच केले होते.आम्ही MVA (महा विकास आघाडी) च्या रुतुजा लटके यांच्या विरोधात उमेदवार उभा केलेला नाही. हीच परंपरा चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत कायम राहील,” अशी आशा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
तसेच बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मृत आमदाराच्या कुटुंबातील सदस्याला बिनविरोध निवडून देण्याची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. आम्हाला आशा आहे की यावेळीही परंपरा पाळली जाईल. याबाबत चर्चेसाठी कोण पुढाकार घेणार, असे विचारले असता म्हस्के म्हणाले, “निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील. आम्ही परंपरेचे पालन केले आहे, त्यांनीही (मविआ) असे पाऊल उचलले पाहिजे.