शबनम न्युज | पुणे
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर राजगुरू नगर येथील त्यांच्या निवासस्थानी गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे या दोन आरोपींवर खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत थिगळे हे सुखरूप बचावले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी थिगळे यांच्या घरात घुसले. या भागातील ‘भाई’ असल्याचे सांगून आरोपींनी थिगळे यांच्याकडे पैशांची मागणी केली. एका आरोपीने थिगळे यांच्याकडे बंदूक दाखवून ट्रिगर खेचला, पण बंदुकीला कुलूप लागल्याने गोळी सुटली नाही. त्यानंतर आरोपींनी हवेत गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. त्याप्रसंगी थिगळे यांचे कुटुंबीय हि उपस्थित होते. बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी राजगुरू नगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत आहेत.