शबनम न्युज | पुणे
येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘टेक फॉर गुड हाकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेतील नेटस्काऊट आणि शूटिंग स्टार्स यांच्या सहयोगाने २१ व २२ जानेवारी २०२३ या कालावधीत ही हॅकेथॉन झाली. सलग २४ तास कोडींग करून संकल्पनांचे सादरीकरण व अप्लिकेशन विकसित करावयाची होते. जगभरातून २२४ संघ सहभागी झाले होते. एकूण ९५४ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. त्यांनी आपल्या कल्पना आणि प्रकल्प सादर केले. ‘टेक फॉर गुड हाकेथॉन’मुळे विद्यार्थ्यांमधील नवकल्पना, प्रात्यक्षिक व पाठ्यक्रमात ज्ञान आणि उद्योगातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होण्यास मदत झाली.
तरुणांच्या उर्जेला प्रोत्साहन देऊन त्यांच्या कल्पना व्यावसायिक बाजारपेठेत आणणे ही काळाची गरज आहे आणि अशा कार्यक्रमांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मदत होते, असे मत नेटस्काऊटच्या सहायक उपाध्यक्षा लथा नारायणन यांनी व्यक्त केले. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी करण्यासाठी काय करावे आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून उद्योगांना काय अपेक्षा आहेत याविषयी नेटस्काऊटचे संचालक संदेश रोकडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच तांत्रिक कल्पना उत्पादनात रूपांतरित करण्याबाबत त्यांनी विचार मांडले. अशा कार्यक्रमांमुळे टॅलेंट ऍक्विझिशन टीमला इंटर्नशिप आणि पूर्णवेळ नियुक्ती प्रक्रियेसाठी फ्रेशर्स ओळखण्यात आणि निवडण्यात मदत होते, असे एचआर मॅनेजर हर्षा सचदेव यांनी सांगितले.
तांत्रिक शिक्षण आणि गैर-तांत्रिक शिक्षण यातील मुख्य फरक हा आहे की तांत्रिक शिक्षण कल्पनांच्या वापराशी संबंधित आहे आणि तांत्रिक लोकांनी नेहमी कल्पनांच्या वास्तविक वेळेत वापर करण्याबद्दल विचार केला पाहिजे, असे मत कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला यांनी व्यक्त केले. हॅकेथॉन च्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. निलेश उके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. किरण पवार व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.