शबनम न्युज | पुणे
महाराष्ट्रातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी उमेदवार उभे करण्याची शक्यता असल्याने, ही जागा राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. दरम्यान, आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून, कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. तसेच कसबा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील ते करतील अशी शक्यता आहे. आज संध्याकाळी ही बैठक होणार असून, निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत, असे पुणे शहर भाजपचे प्रमुख जगदीश मुळीक यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगाने (ECI) कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागांसाठी 26 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. कसबा पेठच्या भाजपच्या स्व. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागा रिक्त झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 10 फेब्रुवारी आहे.नुकतेच निधन झालेल्या भाजपच्या माजी आमदारांच्या स्मरणार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, मागील पोटनिवडणुकीत भाजपच्या भूमिकेचा दाखला देत विरोधी पक्ष माघार घेण्याची शक्यता नाही.
कसबा मतदारसंघात विरोधी पक्षाकडून काँग्रेसचे शहरप्रमुख अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर आणि रोहित टिळक, तर राष्ट्रवादीकडून रूपाली पाटील ठोंबरे हे इच्छुक उमेदवार आहेत.