शबनम न्यूज | पुणे
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट अंतर्गत सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ अल्टरनेटीव्ह थेरपीज अँड रिसर्चच्या वतीने ‘सूर्यदत्त’च्या रौप्यमहोत्सवी (२५ व्या) स्थापना दिनानिमित्त दि. ८ व ९ फेब्रुवारी २०२३ या दोन दिवशी मोफत ऑस्टियोपॅथीक तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. श्री संवरलाल ऑस्टियोपॅथी चॅरिटेबल संस्थान-पराशर हीलिंग या संस्थेच्या सहयोगाने हे शिबीर होत आहे. ऑस्टियोपॅथीक तज्ज्ञ डॉ. गोवर्धनलाल पाराशर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनात या दोन दिवशी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या बावधन कॅम्पसमध्ये शिबिरासाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींना तपासणी व उपचाराचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी दिली.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “डॉ. पाराशर श्री संवरलाल ऑस्टियोपॅथी चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष आहेत. ही संस्था जोधपूर, राजस्थान येथे आहे. त्यांनी पर्यायी वैद्यकीय थेरपी, ‘ऑस्टियोपॅथी’ला जगभरात मानाच्या स्थानावर नेले आहे. संपूर्ण भारतात नव्हे, तर जगामध्ये त्यांची ओळख आहे. गेल्या ३९ वर्षांहून अधिक काळ ते उपचार करण्याच्या या कलेचा सराव करत आहेत. त्यांनी आजपर्यंत जगभरात २५०० हून अधिक मोफत शिबिरे आयोजिली आहेत. स्लिप डिस्क आजाराने पीडित असंख्य लोकांना त्यांनी पुन्हा चालायला लावले आहे आणि हाडे, स्नायू आणि मज्जातंतूच्या विकाराच्या असंख्य रुग्ण कोणत्याही औषधाशिवाय बरे केल्या आहेत.”
“ऑस्टियो संधिवात, पाय, घोटा, नितंब आणि गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी आणि सायटिका, हात, खांदा आणि कोपर दुखणे, डोकेदुखी, स्पाइन फ्लुइड लीकेज, हात आणि पाय सुन्न होणे, हाताचा थरकाप, स्प्रेन इजा, स्लिप डिस्क, अस्थिबंधन दुखणे आणि फाटणे, पेन डाउन समस्या, हाडांची अव्यवस्था, स्पॉन्डिलायसिस, टेनिस आणि गोल्फर कोपर, घोटा आणि पाय दुखणे, गर्भधारणा, क्रीडा इजा, ड्रायव्हिंग किंवा कामाचा ताण, किंवा पचन समस्यांमुळे पोस्चर समस्या, मायग्रेन, लुम्बॅगो आणि सायटिका आदी आजारांवर ही थेरपी प्रभावी ठरते. ऑस्टियोपॅथी ही एक औषध-मुक्त, नॉन-इनवेसिव मॅन्युअल थेरपी आहे. ज्याचा उद्देश मस्कुलोस्केलेटल फ्रेमवर्कमध्ये फेरफार करून आणि मजबूत करून सर्व शरीर प्रणालींमध्ये आरोग्य सुधारणे आहे. एक ऑस्टियोपॅथिक चिकित्सक सांधे, स्नायू आणि मणक्यावर लक्ष केंद्रित करेल. उपचाराचा उद्देश शरीराच्या मज्जासंस्था, रक्ताभिसरण आणि लसीका प्रणालींवर सकारात्मक परिणाम करणे आहे. औषध म्हणजे निदान आणि उपचार दोन्ही हातांनी केले जातात,” असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.
पुणे परिसरातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पीडितांना ऑस्टियोपॅथी उपचार पद्धतीची गरज आहे. या शिबिराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर २०० जणांना लाभ घेता येईल. ८ फेब्रुवारीला सकाळी ९ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत, तर ९ फेब्रुवारीला सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ४ या वेळेत हे शिबीर होणार आहे. नोंदणीसाठी ७२६२०११७७४, ९७६३२६६८२९ व ८९५६९३२४०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व डॉ. गोवर्धनलाल पराशर यांनी केले आहे.