शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरिता येत्या 26 फेब्रुवारी रोजी निवडणूक पार पाडणार आहे. या निवडणुकीकरिता भाजप वतीने स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना संधी देण्यात आली. नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेचे नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कलाटे यांची समजूत काढली असतानाही, कलाटे निवडणूक लढविण्यास ठाम आहेत. यानंतर कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, याकरिता प्रयत्न सुरू असल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानंतर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना, ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी राहुल कलाटे यांची भेट घेतली. त्यानंतर कलाटे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती देखील त्यांनी केली.
राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राहुल कलाटे यांना केली आहे. कलाटे यांना थेट उद्धव ठाकरेंनी फोन करून अर्ज मागे घेण्यास विनंती केली आहे, अशी माहिती सचिन अहिर यांनी दिली. ते म्हणाले की, “राहुल कलाटे आणि पक्षप्रमुख यांचा फोन संवाद झाला आहे. पक्षप्रमुखांची देखील ही विनंती आहे,” यानंतर राहुल कलाटे अर्ज मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा झाल्यानंतर, “कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी भूमिका कलाटे यांनी जाहीर केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काहीच तासांचा अवधी उरलेला आहे. त्यामुळे राहुल कलाटे उमेदवारी अर्ज मागे घेणार का? हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.