शबनम न्युज | चिंचवड
नेहरू युवा केंद्र पुणे यांच्यावतीने आज निवडणूक विभागामार्फत व्यापक मतदान जनजागृती अभियानास चिंचवड विधानसभा मतदारसंघ परिसरातून मोठ्या उत्साहात वरप्रभ शिरगावकर यांनी चार्ली चॅप्लिनच्या वेषामध्ये मतदार जनजागृती केली. त्यांचे समवेत अनिल गायकवाड सहभागी झाले होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्वेता आल्हाट यांच्या सूचनेनुसार शहरातील विविध भागात मतदार जनजागृती करण्यात आली.
निवडणूक विभागामार्फत चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी कलापथके, सांस्कृतिक कार्यक्रम करणारे समूह, महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक यांचा सहभाग घेण्यात येत आहे. सार्वजनिक इमारती, रुग्णालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या परिसरात तसेच विविध सोसायट्यांमधून छोट्या- छोट्या कार्यक्रमाद्वारे, पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्व पटवून देण्यात येत आहे.
नेहरु युवा केंद्राच्यावतीने आज चिंचवड विधानसभा मतदारसंघ परिसरातील भाजी मंडई, बस स्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी मतदार जनजागृती करण्यात आली. मतदानाचा संदेश देणाऱ्या ‘चार्ली’ने परिसरातील डॉक्टर, युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, नागरिक यांचे लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी त्यांच्या कलेलाही दाद दिली.
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी देखील या मतदार जनजागृतीच्या अभियानाचे कौतुक केले असून मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या थेरगांव येथील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयामधील कक्षामध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, माध्यम कक्ष समन्वय अधिकारी
किरण गायकवाड यांच्यासह नामनिर्दिष्ट उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.