शबनम न्युज | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या एका निर्णयाने खळबळ उडवून दिली आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या “लोक माझे सांगाती” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. तसेच इथून पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असंही त्यांनी जाहीर केलं.
“प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शरद पवारांनी जाहीर केलं.
शरद पवारांच्या निर्णयानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना अश्रू अनावर झाले. सगळ्यांनी घोषणाबाजी केली. तसेच अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निर्णय शरद पवार मागे घेत नाहीत तोपर्यंत इथून जाणार नाही असा पवित्रा घेतला. काही कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील राजीनामा देण्याचा इशारा दिला.
अजित पवार यांनी मात्र शरद पवारांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, रडणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी खडसावलं. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याशी आपली चर्चा झाली असल्याचंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.