शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने एका सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. त्याच्याकडून चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस आला आहे. प्रदीप उर्फ पांडुरंग लहू सुतार (वय 32, रा. काळेवाडी फाटा, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड परिसरात चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, मोबाईल चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेने पथकामार्फत तपास सुरू केला असता, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला पथकाने लातूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने त्याचा साथीदार रामा पाटील यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. प्रदीप हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, सदोष मनुष्यवादाचा प्रयत्न, गंभीर दुखापत व वाहन चोरीचे असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा अधिक तपास रावेत पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त, गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सुनील कानगुडे, प्रदीप गोडांबे, आशिष बोडके यांच्या पथकाने केली.