शबनम न्युज | मावळ
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील जनविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी भर दिवसा कोयत्याने वार करून तसेच गोळ्या झाडून तळेगाव दाभाडे नगरपरिषद परिसरात हत्या करण्यात आली. या हत्येचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने होत असून हत्या झाल्याच्या 24 तासाच्या आत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
यामध्ये श्याम लिगडकर, प्रवीण धोत्रे, आदेश धोत्रे, संदीप मोरे यांचा समावेश आहे. या चारही जणांना आज वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मध्यंतरी किशोर आवारे यांची आई सुलक्षणा आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके त्यांचे बंधू सुधाकर शेळके व इतर एक असे तिघांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
आज सकाळीच आमदार सुनील अण्णा शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण असे राजकारण करणार नाही, पोलीस यंत्रणा योग्य तो तपास करेल, असे सांगितले. आज चारही जणांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मार्फत करण्यात येत आहे.