शबनम न्युज | पुणे
जगातील अद्वितीय असे राजा दिनकर केळकर संग्रहालय उभारणाऱ्या ज्येष्ठ संग्राहक कै.दिनकर केळकर यांना जागतिक संग्रहालय दिनी केळकर कुटुंबियांनी पुणेकरांच्या वतीने आदरांजली अर्पण केली.गुरुवारी,दि १८ मे रोजी सकाळी कै.दिनकर केळकर यांच्या पुतळ्याला दिनकर केळकर यांचे पुतणे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर,सौ.अरुणा श्रीकांत केळकर यांनी पुष्पहार अर्पण केला.डॉ.सुधन्वा रानडे,पुणेकर नागरिक यावेळी उपस्थित होते. संग्रहालय पाहायला आलेल्या विद्यार्थी,नागरिकांना त्यांनी जागतिक संग्रहालय दिन तसेच कै.दिनकर केळकर यांच्या संग्राहक वृत्तीची आणि ध्यासाची माहिती दिली.
जागतिक संग्रहालय दिन
‘दरवर्षी १८ मे रोजी ‘जागतिक संग्रहालय दिन’ जगभर साजरा केला जातो.संग्रहालयात जपलेला वारसा,संस्कृती,इतिहास याला यानिमित्ताने उजाळा मिळावा,असा यामागचा उद्देश असतो. गेल्या ४० वर्षांपासून ही परंपरा चालू आहे.यानिमित्त जगभर संग्रहालय भेटी,प्रदर्शने,चर्चासत्रे असे उपक्रम आयोजित केले जातात‘,असे डॉ श्रीकांत केळकर यांनी सांगितले.
केळकर कुटुंबियांकडून कृतज्ञ स्मरण
पुण्यात आलेल्या कोणत्याही पाहुण्यांनी किंवा सुटीत मुलांनी भेट देण्यायोग्य जागा म्हणजे राजा दिनकर केळकर संग्रहालय. पुरातन वस्तूंचा एवढा प्रचंड संग्रह, तो पण एकाच व्यक्तीच्या व्यासंगातून केलेला, बहुतेक इतर कुठेही बघायला मिळायचा नाही.डॉ. दिनकर केळकर यांनी एक छंद म्हणून हा संग्रह एकत्र केला. ज्येष्ठ बंधुंसोबत ते चष्म्याचे दुकान चालवत होते. ऐतिहासिक कविता करत असताना केळकरांना आपल्या वस्तू संग्रहाच्या अनोख्या छंदाने साद घातली. १९२० मध्ये पेशव्यांचे एकेकाळचे सावकार दीक्षित पटवर्धन यांच्याकडील एक लघुचित्र त्यांनी मिळवले. ही केळकर संग्रहालयाची पहिली कलाकृती ठरली. पुढे ते जुन्या वाड्यांचे कलाकुसर असलेले दरवाजे आणि खिडक्या जमा करू लागले.
थोरले बाजीराव पेशवे यांनी बांधलेला मस्तानी महालानंतरच्या काळात दुरवस्थेत होता. तो जसाच्या तसा आणून, दुरुस्ती करून, त्याला पूर्ववत झळाळी आणून आपल्या संग्रहालयात उभा केला. अशा या केळकरांच्या अफाट संग्रहाला आधी त्यांच्या राजा या, लहान वयातच मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव त्यांनी दिले. ‘राजा संग्रह’ असे सुरवातीचे नाव होते. पुढे त्याचे ‘राजा केळकर हिस्टॉरिकल कलेक्शन’ आणि तदनंतर ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’ असे नाव रूढ झाले.
वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना गदिमा त्यांना येथे घेऊन आले. भारावून जाऊन आणि संग्रहालयाचे महत्त्व लक्षात घेऊन वसंतरावांनी, ‘याचे लोकार्पण करा, आम्ही हे पुढे सांभाळू’ अशी तयारी दाखवताच एका सहीनिशी केळकरांनी १२ एप्रिल १९७५ ला संग्रहालयाचे लोकार्पण केले. दिनकर केळकरांना १९७८ मध्ये पुणे विद्यापीठाने डी. लिट. पदवीने सन्मानित केले. १९८१ मध्ये पद्मश्री हा सन्मानही मिळाला.
आज त्यांचे नातू सुधन्वा रानडे हे या संग्रहालयाची धुरा सांभाळत आहेत. वस्तूसंग्रह २४ हजार वस्तुंपेक्षा जास्त आहे. जागेअभावी त्यातील ११ टक्के वस्तूच लोकांना बघता येतात. अर्थातच आता नवीन जागेत भव्य असे संग्रहालय बांधायचा संकल्प रानडे यांनी सोडला आहे. त्यासाठी राज्य सरकारने बावधन बुद्रूक येथे मोठी जागा उपलब्ध करून दिली आहे
Advertisement