शबनम न्युज | पुणे
मॉडेलिंग क्षेत्रात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने 203 जणांची 44 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. मॉडेलिंग क्षेत्रात कामाची संधी तसेच दररोज पाच ते सहा हजार रुपये कमवा, अशी जाहिरात बाजी करून युवक युवतींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपींनी 203 जणांकडून 43 लाख 93 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका युवतीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानंतर एका महिलेसह योगेश मदनलाल मुदंडा (दोघेही रा. छत्रपती संभाजी नगर) जय पंकज चावजी, शुभम जयप्रकाश पगारे, अनिरुद्ध बिपिन रासने (रा.कोथरूड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडलिंग क्षेत्रात कामाची संधी देणार असल्याचे आमिष दाखवून जाहिरात बाजी करून समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आली. रंगभूषाकार, केशरचना, छायाचित्रकारांना मॉडलिंग क्षेत्रात कामाची संधी असल्याचे आमिष दाखवण्यात आले. दररोज पाच ते सात हजार रुपये मिळतील, असा उल्लेख देखील जाहिरातीत करण्यात आला. आमच्या कंपनीला काम मिळाले आहे, यासाठी कामासाठी इच्छुक असणाऱ्यांना तीन महिन्यांसाठी 425 रुपये आणि दोन वर्षांसाठी 17 हजार रुपये भरावे लागतील, असे कामासाठी इच्छुकांना सांगण्यात आले. त्यानंतर या घटनेत 203 जणांनी पैसे भरल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे युवतीला कळाले असता, तिने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून याबाबत अधिक तपास कोथरूड पोलीस करीत आहेत.