शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील यमुनानगर येथील स्व. मीनाताई ठाकरे जलतरण तलावाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसे चे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी मनपाचे क्रीडा विभागातील अतिरिक्त आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी ते म्हणाले कि, प्रभाग क्रमांक १३ मधील यमुनानगर निगडी येथील स्व. मीनाताई ठाकरे जलतरण तलावाचे काम नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्ण होऊन तो नागरिकांना वापरासाठी खुला करण्यात आला होता. तथापि त्या तलावाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे केल्याने त्यामुळे जे नागरिक तसेच मुले पोहण्यासाठी येत होती त्यांना बऱ्याच गंभीर प्रकारच्या इजासुद्धा झालेल्या आहेत. कोव्हीड काळात सलग 2 वर्षे जलतरण तलाव बंद होता, त्यामुळे सदर परिसरातील नागरिक व विद्यार्थी ह्यांना ह्या जलतरण तलावाचा वापर करता आला नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ दरम्यान या तलावाचे काम करण्यात आले व नागरिकांसाठी हा तलाव खुला करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी पुढील काळासाठी बुकिंग सुद्धा करून ठेवले होते तसेच विद्यार्थ्यांचे पोहण्याचे क्लासेस सुद्धा चालू झाले परंतु निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्या कारणाने हा तलाव बंद करावा लागला व याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला.
ऐन उन्हाळ्याच्या एप्रिल-मे च्या काळात जलतरण तलाव पुन्हा बंद करावा लागला. अजूनही तो तलाव बंद असून ठेकेदाराकडून पुढील कामासाठी चालढकल करण्यात येत आहे. तरी संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याला पालिकेच्या काळ्या यादीत समाविष्ट करावे व सदर काम दुसर्या एखाद्या चांगल्या ठेकेदारास देऊन लवकरात लवकर हा जलतरण तलाव नागरिकांसाठी वापरास उपलब्ध करून देण्यात यावा. असे ते म्हणाले.
याप्रसंगी मनोज लांडगे,निलेश पवार,जय सकट रोहिदास शिवनेकर आदी उपस्थित होते.