शबनम न्युज | पुणे
मावळ लोकसभा मतदारसंघात होणारी मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून मतदारांनी आपला संविधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फुर्तपणे मतदान करून इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले.
मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी माहिती देताना दीपक सिंगला बोलत होते.
यावेळी पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस उप अधीक्षक सत्य साई कार्तिक, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिंमत कराडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के, माध्यम समन्वयक शिवप्रसाद बागडी, किरण गायकवाड यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
मतदान साहित्य वितरण, मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, टपाली मतदानाची आकडेवारी, आचारसंहिता कालावधीत केलेली कारवाई, संवेदनशील तसेच विशेष मतदान केंद्रांची माहिती, मावळ मतदारसंघात येणाऱ्या मतदारांची आकडेवारी, दिव्यांग तसेच तृतीयपंथी मतदारांची आकडेवारी, मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या मनुष्यबळाची माहिती, मतदान साहित्य वाटप प्रक्रिया, गृहमतदानाची आकडेवारी, आदर्श मतदान केंद्रांची माहिती, वाहतुक आराखडा, मतदान यंत्रांची आकडेवारी तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर असलेल्या विविध निर्बंध आणि त्याबाबतच्या नियमावलीबाबत दीपक सिंगला यांनी सविस्तर माहिती दिली. मावळ मतदारसंघात एकूण १६ संवेदनशील मतदान केंद्रे असून या मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे, असे देखील ते म्हणाले.
कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देताना सत्य साई कार्तिक म्हणाले, भयमुक्त व निकोप वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेद्वारे पोलीस गस्त, पोलीस पथ संचलन तसेच प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. शिवाय विविध पथकांद्वारे देखील पोलीस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलीस बंदोबस्तासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मतदान केंद्र तसेच इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आली आहे, असे सत्य साई कार्तिक यांनी सांगितले.
मतदान केंद्रावर विविध सुविधा
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सुमारे २ हजार ५६६ मतदान केंद्रांसाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक असे एकूण ११ हजार ४८४ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच २९१ सेक्टर अधिकारी देखील नेमण्यात आले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय रविवार १२ मे रोजी मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्याचे वितरण केले जाणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच पिण्याचे पाणी, व्हिलचेअर व्यवस्था, उन्हापासून बचाव होण्यासाठी शेड, प्रतिक्षा कक्ष तसेच प्रथमोपचार पेटीसह ओआरएस सुविधाही देण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती दीपक सिंगला यांनी दिली.
कंट्रोल रुमद्वारे लक्ष ठेवणार
मतदानाच्या दिवशी संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ५० टक्के मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली आहेत. तसेच संपुर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून तात्काळ समन्वय करण्यासाठी आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रत्येकी १ असे एकूण ७ नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. नियंत्रण कक्ष समन्वयासाठी २ उपजिल्हाधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाशी समन्वय ठेवून माहिती संकलन आणि जलद गतीने संवाद साधण्यासाठी ३ तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रार निवारणासाठी एका कार्यकारी अभियंत्याची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने सहाय्यक निवडणूक अधिकारी कार्यालय स्तरावरील नियंत्रण कक्षाची रचना करण्यात आली आहे.
९० टक्के ओळख मतदार चिठ्ठ्यांचे वाटप
मावळ लोकसभा मतदारसंघातंर्गत येणाऱ्या पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आतापर्यंत ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात ओळख मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
विविध पथकांद्वारे केलेली कामगिरी
मावळ लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात ४४ भरारी पथक, १९ तपासणी पथक, ३८ स्थिर सर्वेक्षण पथक, १२ व्हिडीओ सर्वेक्षण पथक, ६ कृती दलासह ईव्हीएम सुरक्षा पथक आणि इतर आवश्यक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या असून या पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत १ कोटी ४९ लाख रुपये रोख, ६९ लाख ४० हजार रुपये किंमतीचे मद्य, ६२ लाख ४७ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, १ कोटी ९८ लाख रुपये किंमतीचे मौल्यवान वस्तू, २० वाहनांमधून ३९ लाख १२ हजार रुपये किंमतीचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच संबंधितांवर विविध कलमांच्या आधारे एकूण २७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती दीपक सिंगला यांनी दिली.
मतमोजणीचे नियोजन
१३ मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ जून २०२४ रोजी , बालेवाडी, पुणे येथील श्री शिव छत्रपती क्रिडा संकुलातील वेट लिफ्टींग हॉलमध्ये मतमोजणीची प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघनिहाय अनुक्रमे २४, १४, १४, १६, २४ आणि १६ असे एकूण १०८ मत मोजणीचे टेबल असणार आहेत. पिंपरीसाठी २३ फेऱ्या, कर्जतसाठी २४ फेऱ्या, उरणसाठी २४ फेऱ्य़ा, मावळसाठी २५ फेऱ्या, चिंचवडसाठी २३ फेऱ्या तर पिंपरीसाठी २५ फेऱ्या अशा एकूण १४४ मतमोजणीच्या फेऱ्या होतील. त्याचबरोबर टपाली मतदानासाठी ४ टेबल, ईटीपीबीएससाठी १ टेबल असे एकूण ५ टेबल असतील. एकूण ११३ टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.