शबनम न्युज | पिंपळे गुरव
मतदानाच्या एक दिवस आधी सांगवी पिंपळे गुरव परिसरात लावण्यात आलेल्या खोडसाळ जाहिरात फलकांशी आमचा काहीही संबंध नाही. मतदारांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये. संपूर्ण जगताप परिवाराचा पाठिंबा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनाच आहे, अशी ठाम भूमिका चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी घेतली आहे. ‘साहेबांनी’ स्वतः 2019 मध्ये बारणे यांना 96 हजारांचे मताधिक्य मिळवून दिले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप कट्टर समर्थक या नावाने खोडसाळ अपप्रचार करणारे काही जाहिरात फलक मतदानाच्या तोंडावर सांगवी, पिंपळे गुरव भागात लावण्यात आले आहेत. त्याचा आमदार अश्विनी जगताप यांनी निषेध केला. प्रशासनाने या फलकांवर व फलक लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे कट्टर मोदी समर्थक होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी नेहमीच महायुतीच्या धर्माचे पालन केले. 2014 मध्ये राजकीय परिस्थिती वेगळी होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साहेबांनी महायुती धर्माचे कायम पालन केले होते. 2019 मध्ये साहेबांनी बारणे यांचा जोरदार प्रचार करून त्यांना तब्बल 96 हजारांचे मताधिक्य मिळवून दिले होते. साहेबांच्या विधानसभा निवडणुकीतही बारणे यांनी मोठी मदत केली होती. पोटनिवडणुकीतही बारणे यांचे सहकार्य लाभले होते. ‘साहेब’ हे शेवटच्या श्वासापर्यंत महायुतीचे कट्टर समर्थक होते. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे संपूर्ण जगताप परिवार व त्यांचे समर्थक सदैव महायुतीच्या पाठीशी राहतील.
लोकनेते लक्ष्मण जगताप यांचा कोणताही समर्थक अशा प्रकारे खोडसाळ अपप्रचार करणारे फलक लावणे शक्य नाही. त्यामागे महायुतीच्या विरोधकांचाच हात आहे, असा आरोप आमदार जगताप यांनी केला.
महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांना चिंचवड मतदारसंघातून एक लाख पेक्षा अधिक मताधिक्य देण्याचा शब्द दिवंगत साहेबांच्या वतीने मी स्वतः आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिला आहे. तो शब्द पाळणे हे प्रत्येक समर्थकाचे कर्तव्य आहे, असेही त्या म्हणाल्या.