शबनम न्युज | कामशेत
कामशेत येथे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी पोलिस पथकासह छापा टाकून वेगवेगळ्या वजनाचे एकूण ३२ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. पॅकिंगच्या प्लास्टिक पिशव्यांसह एकूण ३,२०,१४६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली.
दिनेश दीपक शिंदे (वय २४, रा. कामशेत) आणि सौरभ राजेश शिनगारे (२४, रा. कामशेत) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस अमोल ननवरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण तपास करीत आहेत.
कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत आहे. त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.