शबनम न्युज | पुणे
सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या पुढाकाराने पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाबाबत आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि लोणी व धामणी ग्रामस्थांसोबत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले.
आंबेगाव तालुक्यातील शेती, उद्योग, रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या जमिनीच्या दराबाबतच्या मागणी संदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन केल्याने शेतकऱ्यांनी महामार्गासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली.
यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे पुणे विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी हनुमंत अरगुंडे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय कल्याण पांढरे, आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, महामंडळाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
समृद्धी महामार्गाला या महामार्गाची जोडणी होणार असल्याने या भागात आणखी उद्योग येणार आहेत. पर्यायाने रोजगार निर्मिती होणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य तो मोबदला देण्यात येईल, असेही महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.