शबनम न्युज | पिंपरी
सांगवी व बोपोडी या दोन्ही भागांना जोडणाऱ्या मूळा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम हे पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने अंतिम टप्प्यात आले आहे. संयुक्त प्रयत्नातून राबविलेल्या या प्रकल्पाचा उद्देश महत्त्वाच्या भागातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी करण्याचा असून लवकरच हा पुल नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
पुल बांधणीसाठी येणाऱा खर्च हा पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन्ही महानगरपालिका मिळून ५०-५०% असा विभागून करणार आहेत. पुलाचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रगतीपथावर असून कामाची मुळ मुदत २४ महिने इतकी होती. परंतु कामातील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र राहुरी यांची काही भागातील जागा मिळण्यास विलंब झाल्याने या कामास ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुलाच्या कामाची स्विकृत निविदा र.रु. ३२.३६ कोटी इतकी असून कामाच्या व्याप्तीमध्ये मुळा नदीवरील एकूण १२५ मीटर लांबीचा पूल प्रस्तावित आहे. तसेच यामध्ये एकुण २५ मीटर लांबीच्या ५ गाळ्यांचा समावेश आहे. १८ मीटर रुंदी असलेल्या या पुलाच्या दोन्ही बाजूस पादचारी मार्गाची सोय उपलब्ध असणार आहे. पुणे शहराच्या बाजूकडील पोहोचरस्ता हा ५४० मीटर तर पिंपरी चिंचवड बाजुकडील पोहोचरस्ता हा ९५ मीटर लांबीचा आहे.
७६० मीटर लांबी असलेल्या या पुलामुळे सांगवी बोपोडी हे अंतर कमी वेळेत पार करता येणार असून यामुळे ब्रेमेन चौक, औंध रावेत रस्ता, खडकी रस्त्यावरील रहदारी कमी होण्यास तसेच वाहतुक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. सद्यस्थितीत पुलाचे काम ९०% पुर्ण झाले आहे. लवकरच हा पुल नागरिकांसाठी खुला करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे, अशी माहिती मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.
• प्रकल्पातील महत्वाचे मुद्दे –
– प्रकल्पाची किंमत: ३२.३६ कोटी रुपये
– पुलाची लांबी: पाच २५-मीटर गाळ्यांसह १२५ मीटर
– पुलाची रुंदी: चार पदरी रस्त्यासह आणि पदपथांसह १८ मीटर
– दोन्ही हद्दीतील लांबी : ५४० मीटर (पुणे बाजू), ९५ मीटर (पिंपरी चिंचवड बाजू)
– पूर्णता स्थिती : ९०% काम पूर्ण, ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी सेट
– फायदा : ब्रेमेन चौक, औंध-रावेत रोड आणि खडकी रोड येथे वाहतूक कोंडी होणार कमी