शबनम न्युज | मुंबई
शुक्रवारी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व ९ उमेदवार निवडून आले. तर महाविकास आघाडीची तीन पैकी दोन उमेदवार निवडून आले. तर शरद पवार गटाच्या पाठिंबावर उभे असलेले शेकापचे जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या या पराभवानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपले स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले, “मी पराभवाचं आत्मचिंतन करत आहे.महाराष्ट्रात या पद्धतीचं राजकारण आधी नव्हतं. थोडंफार इकडे-तिकडे व्हायचं. मी निवडणुका लढवल्या तेव्हा अशी स्थिती नव्हती. हे असं घडत असेल तर जनतेनं दोन्ही सभागृहं कोण ताब्यात घेईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
“मी राष्ट्रवादीच्या १२ मतांवर उभा होतो. त्यातलं एक मत फुटलं. आमचीही मतं फुटली. मला जर चार मतं मिळाली असती, तर दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत मी २५ ते ३० मतं आणखी घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होतं”, असं म्हणत शरद पवार गटाची पूर्ण १२ मतं आपल्याला मिळाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “आम्हाला मानणारी आमच्या आघाडीतली दुनियेची मतं फुटली तर त्यांच्या एका मताचं काय घेऊन बसलात?” अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.