शबनम न्युज | मुंबई
नुकतेच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीनंतर मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शेकापचे जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यासंदर्भात मोठा गोप्यस्फोट केला आहे.
भाजपच्या 103 आमदार व त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांची लोक निवडून आणले आहेत. शिंदे गट व अजित पवार गट हे दोन गद्दार गट आहेत. त्यांनी आपल्या दोन-दोन गद्यारांना मतांच्या ताकदीवर निवडून आणले. गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
ते पुढे म्हणाले, काँग्रेसची जी सात मते फुटली, ती मागील दोन वर्षापासून काँग्रेस सोबत नाही. यामुळे आम्हाला कोणताही धक्का बसलेला नाही. अपक्ष आमदारांचा भाव काल शेअर मार्केट सारखा होता, वाढतच होता. यामुळे महाविकास आघाडी मजबूत आहे. शिवसेनेकडे केवळ 15 मते असताना मिलिंद नार्वेकर हे निवडून आले. जयंत पाटील निवडून आले असते पण गणित जुळले नाही. त्यांच्याकडे स्वतःच्या पक्षाचे मत नव्हते. इतर घटक पक्षांवर आम्ही अवलंबून होतो, परंतु ते सत्ताधाऱ्यांसोबत होते. जयंत पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.