शबनम न्युज | पिंपरी
दोघांना लंडनमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून दोघांकडून १६ लाख १४ हजार २१ रुपये घेतले. मात्र, नोकरी लावून न देता त्यांची फसवणूक केली. ही घटना चिंचवड येथील पूर्णा नगर मध्ये ऑगस्ट २०२० ते १३ जुलै २०१४ या कालावधीत घडली.
श्वेतांक राजेंद्र शिंदे (वय २८, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, किरीट कुमार कन्हैया लाल पटेल (वय ४३, रा.पूर्णा नगर, चिंचवड) तसेच किरीट कुमार यांची पत्नी काजल प्रागडा (वय ३५) किरीट कुमार यांची दुसरी पत्नी शिल्पा बेन पटेल (वय ४०) तसेच किरीट कुमार यांचा अकाउंटंट गजानन भास्कर देशपांडे (वय ४२, रा. देशपांडे गल्ली, आष्टी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयतांनी आपसात संगणमत करून फिर्यादी श्वेतांक शिंदे आणि त्यांच्या एका मित्राला लंडनमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून एकूण १६ लाख १४ हजार २१ रुपये घेतले, त्यांना नोकरीसाठी डिपॉझिट रक्कम भरावी लागेल, म्हणून लंडनमध्ये परमनंट विसा काढण्यासाठी व लंडनमध्ये राहण्यासाठी घर भाड्याने घेण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी केली. मात्र, नोकरी काही लावून न देता त्या दोघांची फसवणूक केली. या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.