शबनम न्युज | पिंपरी
तब्ब्ल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी हक्काची जागा मिळाली आहे. जाधववाडी-चिखली येथील गट नंबर ५३९ मधील नऊ एकर जमीन पोलीस आयुक्तालय कार्यालय, निवासस्थान आणि कवायत मैदानाकरिता देण्यास राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने मान्यता दिली. या ठिकाणी सुसज्ज कार्यालय उभारण्यात येणार आहे.
सहा वर्षांपासून पोलीस आयुक्तालयास स्वतंत्र जागा, शासकीय इमारत उपलब्ध नाही. सध्याचे पोलीस आयुक्त कार्यालयसुद्धा महापालिका शाळेच्या इमारतीमध्ये भाडेतत्वावर तात्पुरत्या स्वरुपात सुरु आहे. कामकाजाच्या दृष्टीने ही जागा अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त कार्यालय तसेच इतर कार्यालये, कवायत मैदान, क्रीडांगण व निवासस्थाने यासाठी जागा मिळण्याकरिता पोलिसांनी शासनाला प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार जाधववाडी, चिखली येथील गट नंबर ५३९ मधील ३ हेक्टर ३९ आर जागेत आयुक्तालयाची भव्य वास्तू उभारण्याचा मार्ग मोकळा झाला.
. पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या मालकीची वाकड पेठ क्रमांक ३९ येथील डिस्ट्रीक सेंटरमधील १५ एकर जागाही यापूर्वीच मिळाली आहे. येथे अधिकारी, कर्मचा-यांसाठी निवासस्थाने आणि तांत्रिक कार्यालय उभारण्याचे नियोजन आहे. श्वान पथकासाठी (डॉग स्क्वॉड) फौजदार, अधिकारी कर्मचारी देण्यासही शासनाने मान्यता दिली.
पोलीस आयुक्तालय महापालिकेच्या इमारतीच्या जागेवर भाडेतत्वार आणि अपु-या जागेत होते. त्यामुळे विविध अडचणी येत होत्या. चिखलीत नऊ एकर जागा उपलब्ध झाली आहे. वास्तुविशारदामार्फत डिझाइन तयार केली जाईल. लवकरच प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. न्यायालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस आयुक्तालय जवळच होत असल्याने नागरिकांना फायदा होईल. - विनयकुमार चौबे,पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड