प्रा.आदित्य केदारींची भारतीय संघात निवड; विद्यापीठाच्या अन्य खेळाडूंची स्पर्धेत कडवी झुंज
शबनम न्युज | पुणे
पंजाबमधील मोगा येथे झालेल्या 7व्या राष्ट्रीय इनडोइअर रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या डाॅ.विश्वनाथ कराड क्रीडा अकादमीची खेळाडू भाग्यश्री घुले हिने महिलांच्या एलडब्ल्यू1ई प्रकारात कांस्य पदकाची कमाई करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
यासह या स्पर्धेच्या विविध गटात सहभागी झालेल्या अन्य खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर कडवी झुंज देत अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे, पुरुषांच्या खुल्या एम1ई गटात स्पर्धा केलेल्या प्रा.आदित्य केदारी यांनी एकंदर चौथे स्थान प्राप्त करत भारतीय संघात स्थान मिळविले आहे. केदारी हे सध्या विद्यापीठाच्या ‘स्कुल ऑफ लाॅ’मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.
यासह, केदारी, स्नेहा सोळंकी, योगेश बोरोले आणि भाग्यश्री घुले यांचा समावेश असलेल्या खुल्या मिश्र4ई गटातील संघाने कडवी झुंज दिली, मात्र अगदी थोड्या फरकाने पदक हुकल्याने त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुलांच्या दुहेरी सबज्युनियर गटात प्रथमेश कांदे व श्रेयस गर्जे यांनाही थोड्या फरकाने पदकाला मुकावे लागले. त्यांनीही या गटात चौथे स्थान पटकाविले. यासह एलएम1एक्स4ई, कनिष्ठ महिला 4ई, सब ज्युनिअर पुरुष एकेरी गटात एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या खेळाडूंनी चांगले आव्हान देत अनुक्रमे ७वा, ९वा आणि ८ क्रमांक प्राप्त केला.
या कामगिरीनंतर विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.मोहित दुबे, डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक प्रा.पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ.सुराज भोयार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.