शबनम न्युज | पिंपरी
निगडी प्रभाग क्र. १३, सेक्टर 22 येथील पीसीएमसी कॉलनीमधील हजारो नागरिक धोकादायक व जीर्ण इमारतींमध्ये जीवघेण्या परिस्थितीत राहत आहेत, या कॉलनी मधील नागरिकांच्या मागणीनुसार एस.आर.ए. चा सर्वेक्षण करण्यात यावे, येथील सर्व रहिवाशांना एस आर ए पुनर्वसन योजने अंतर्गत नवीन घरे द्यावीत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी डॉ. चद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
पीसीएमसी कॉलनी ५७६ घरांची दुरावस्था
पीसीएमसी कॉलनी ची स्थापना १९८२ ते १९८५ च्या दरम्यान करण्यात आली. पीसीएमसी कॉलनी मध्ये एकूण ९ इमारती आहेत. एका इमारतीमध्ये ६४ घरे आहेत असे एकूण सर्व मिळून ५७६ घरे होतात. सदर इमारती महानगर पालिकेमार्फत बी.जी. शिर्के यांच्याकडून बांधण्यात आलेली होती.
साधारण ४० ते ४५ वर्षापूर्वी त्या इमारतींमधील घरे महानगर पालिकेकडून पालिकेच्या आरोग्य कर्मचारी यांना विकण्यात आली.
सध्या या इमारतींवर महानगरपालिकेचा कुठलाही ताबा नाही. त्या ठिकाणी सर्व महानगरपालिकाआरोग्य कर्मचारी व त्यांची कुटुंबे राहतात. गेली कित्येक वर्षे येथे सर्वजण आनंदाने राहतात.
पीसीएमसी कॉलनी ५७६ घरांची परिस्थिती आजघडीला खूपच गंभीर आहे. इमारती ४० ते ४५ वर्षे जुन्या असल्यामुळे सर्व इमारती जुन्या व जीर्ण अवस्थेमध्ये आहेत. इमारतींच्या आतील बाजूस जिने, खिडक्या, दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत.
इमारतींमध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल या खूप खराब झालेल्या त्यामुळे वारंवार केबल तुटून वीजपुरवठा खंडित होतो.
या तुटलेल्या केबल्समुळे जीवघेणा मोठा अपघात होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. घरावरील छत हे पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून पाऊस झाला की सर्व पाणी घरामध्ये येते. छतावर वड पिंपळ अशी झाडे उगवलेली असल्यामुळे कधीही छत कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे. असे सचिन चिखले विभागीय आयुक्तांना इमारतींच्या फोटोंसह दुरावस्था वर्णन केली.
५७६ घरे म्हणजे पीसीएमसी कॉलनी मधील इमारती ह्या खूप जीर्ण अवस्थेत असून विविध कारणांमुळे उदा. भूकंपाच्या झटक्यामुळे, ड्रेनेज लाईन किंवा पावसाचे पाणी शिरल्यामुळे बिल्डींग कधीही कोसळू शकते.
अशा भीतीदायक वातावरणामध्ये सर्व नागरिक आपला जीव मुठीत घेऊन येथे राहत आहेत. या इमारतींमधील घरांची मालकी हि नागरिकांची स्वतःची आहे परंतु रेड झोन मुळे खाजगी व्यावसायिकांना बांधण्यासाठी देऊ शकत नाही व या परिसरातील खाजगी व्यावसायिक बांधू शकत नाहीत कारण महानगर पालिकेतर्फे नागरिकांना किंवा बांधकाम व्यावसायिकांना परवानगी सुद्धा मिळू शकणार नाही.
घर आहे त्या जागी बांधू शकत नाही आहे ती इमारत कधीही कोसळू शकते यामुळे नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे.
या पत्राद्वारे आम्ही आपणास नम्र विनंती करतो आहे की, पीसीएमसी कॉलनी मधील नागरिकांना आपण दिलासा द्यावा हि सर्व जागा महानगरपालिकेच्या ताब्यात घेऊन एस.आर.ए. साठी मान्यता द्यावी किंवा इतर ठिकाणी शहरात पीसीएमसी कॉलनी चे स्थलांतर करावे व एस.आर.ए. अंतर्गत सर्वाना घरे देण्यात यावी किंवा याच ठिकाणी सर्व इमारती विकसित करावी व नागरिकांना दिलासा देण्यात यावा. असे सचिन चिखले यांचे मागणी पत्र आहे.
रेड झोन आणि महत्वाचे मुद्दे
१) पीसीएमसी कॉलनी हा परिसर रेड झोन अंतर्गत असल्यामुळे याठिकाणी पुनर्विकास होऊ शकत नाही.
२) पीसीएमसी कॉलनी हा परिसर रेड झोन अंतर्गत महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची बांधकाम विषयक परवानगी मिळत नाही.
३) महानगर पालिकेमार्फत या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे.
४) एस.आर.ए. मार्फत या सर्व परिसराचा सर्वे व नोंदणी करण्यात यावी.
५) नागरिकांच्या मागणीनुसार याच परिसरात पुनर्विकास होण्यासाठी योग्य ती तरतूद करण्यात यावी.
६) याच परिसरात महानगर पालिकेच्या वतीने JNURM च्या बिल्डींग बांधत असताना रेड झोन च्या कायद्याचा कचाट्यात अडकून त्यांच्या बांधकामाला स्थगिती देण्यात आलेली आहे.
७) एस .आर . ए अंतर्गत सर्वे झाल्यानंतर सर्व नागरिक शहरात इतरत्र स्थलांतरित होण्यासाठी सुद्धा तयार आहेत
याबाबत सचिन चिखले यांनी सदर निवेदने पालक मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मनपा आयुक्त शेखर सिंह आणि S.R. A – ॲाफीस पुणे यांना निवेदने पाठवली आहेत.