शबनम न्युज | पिंपरी
“पिंपरी चिंचवड शहराच्या उभारणीत जुन्या जाणत्या नेत्यांनी योगदान दिले. त्यामध्ये स्थानिकांचा वाटा मोठा होता. त्यामुळे शहराची आणि राज्याची प्रगती होत गेली. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ही प्रगती थांबता कामा नये, ज्यांनी नव्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. या शहराच्या जडण-घडणीत अनेक लोकांनी साथ दिली, तशी साथ येणाऱ्या पिढीनेही द्यावी,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाची शनिवार (दि. २०) रोजी पिंपरी चिंचवड मध्ये विजयी संकल्प सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी या सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, बजरंग सोनवणे, आमदार रोहित पवार, युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, आजमभाई पानसरे, तात्या सपकाळ, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शहराध्यक्ष तुषार कामटे, ज्योती निंबाळकर, इमरान शेख, सुलक्षणा धर, युवा नेते निहाल पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी भाजपचे माजी गृहराज्यमंत्री माधव किन्हाळकर यांनी तसेच धुळे, शिंदखेडा येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच शहरातील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना शरद पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड मध्ये छोटे-छोटे गावे होती. नंतर महापालिका झाली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या शहराला उद्योग नगरी बनवले टाटा कंपनी पिंपरीत सुरू करावी. यासाठी स्वतः मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी टाटा यांची भेट घेतली. महाराष्ट्र प्रकल्प सुरू करण्याची विनंती करत एमआयडीसीतील जागा दिली. चव्हाण यांची ही कृती तरुणांना रोजगार देऊन गेली, त्यानंतर एचए बजाज सारखी मोठे प्रकल्प इथे उभे राहिले आणि या भागात औद्योगिक क्रांती खऱ्या अर्थाने झाली आणि पिंपरीचे नाव जगभरात गेले. या शहराच्या जडण-घडणीत अनेक लोकांनी साथ दिली, तशी साथ येणाऱ्या पिढीनेही द्यावी, अशी अपेक्षा शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.