शबनम न्युज | पिंपरी
पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू व चिकुनगुण्या यांसारख्या किटकजन्य आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने “डेंग्यु मुक्त पिंपरी चिंचवड शहर म्हणजेच बीट डेंग्यू मोहिमेची सुरु केली असून त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.
बीट डेंग्यू मोहिमेअंतर्गत सोमवार ते शनिवार डास नियंत्रणाबाबत महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभाग व इतर विभागामार्फत शहरात विविध ठिकाणी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये “प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास” या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी दर रविवारी सकाळी ९ ते १० या वेळेत घरातील पाणी साठवणूकीची साधने स्वच्छ व कोरडी करून एक तास स्वत:साठी व कुटुंबियांसाठी देण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
आज सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालये, दवाखान्यांनी आपापल्या रुग्णालयात, दवाखान्यातील डासोत्पत्ती स्थळे केली नष्ट
डेंग्यूमुक्त पिंपरी चिंचवड शहर मोहिमेअंतर्गत आज सोमवार २२ जुलै रोजी महापालिकेच्या वतीने सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये किटकजन्य आजार आणि डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच रुग्णांलयाच्या परिसरातील डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासमवेत सर्व रुग्णालये, दवाखाने तसेच खाजगी रुग्णालये आणि दवाखाने यांनी आपआपल्या रुग्णालयात तसेच दवाखान्यात साफसफाई व डास उत्पत्ती स्थानके नष्ट करण्याची कार्यवाही केली.
उद्या मंगळवारी सर्व सरकारी, खाजगी कार्यालये तसेच सरकारी खासगी बँकांमध्ये राबविण्यात येणार डेंग्यूमुक्त पिंपरी चिंचवड शहर मोहीम
उद्या मंगळवार २३ जुलै रोजी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सरकारी व खाजगी कार्यालये तसेच सरकारी व खाजगी बँका येथे डेंग्यूमुक्त पिंपरी चिंचवड शहर म्हणजेच बीट डेंग्यू (BEAT dengue) मोहिमेअंतर्गत डास नियंत्रणबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
आज अखेर पर्यंत २७ रुग्णांना डेंग्यूची लागण
आज अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात डेंग्यू आजाराच्या निदानासाठी एकुण ३३५७ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले असता त्यामध्ये २७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आढळून आलेल्या रुग्णांमध्ये १५ पुरुष व १२ महिला रुग्णांचा समावेश आहे.