– आमदार महेश लांडगे यांची यंत्रणा लागली कामाला
– ड्रेनेज, स्ट्रॉमवॉटर लाईनसह रस्त्याचे काम करणार
पिंपरी । प्रतिनिधी
पुणे, पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरात अतिमुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील तळवडे-रुपीनगर भागातील सखल भागामध्ये पाणी साचले. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचे सहकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिसराची पाहणी केली आणि आवश्यक उपाययोजना करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तळवडे येथे संत तुकाराम हौसिंग सोसायटी व श्रीराम काॅलनी क्र. १ परिसरात अतिमुसळधार पावसामुळे सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला आहे. याची तात्काळ दखल घेत आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी परिसरात पाहणी करुन उपाययोजना करण्याची तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे.
यावेळी माजी नगरसेवक शांताराम भालेकर, भाजपा पदाधिकारी किरण पाटील, आमदार लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे, माजी स्वीकृत सदस्य पांडुरंग भालेकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल भालेकर, शरद भालेकर, रामदास कुटे, रवि शेतसंधी, कुणाल पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी पाहणी केली. या भागात स्ट्रॉम वॉटर लाईनअभावी पुरपस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील संबंधित विभागाचे अधिकारी यांना कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत.
तसेच, या भागातील रस्त्यासाठी महानगरपालिकेच्या ताब्यात जागा नसल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्या रस्त्यावर तात्पूरती डागडूजी करण्यात येत आहे. आगामी काळात रस्ता तब्यात घेवून प्रशस्त करण्यासाठी महानगरपालिका स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी दिली.
******
प्रतिक्रिया :
अतिमुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. मावळ आणि शहराच्या परिसरात कमी वेळेत प्रचंड प्रमाणात झालेला पाऊस यामुळे सलख भागात पाणी साचले. जनजीवन विस्कळीत झाले होते. पाणीपुरवठा, वीज पुरवठा आणि रस्त्यांची दुरावस्था अशा समस्या समोर येत आहेत. याबाबत महानगरपालिका, महावितरण, वाहतूक पोलीस यांच्यासह संबंधित शासकीय विभागांकडून तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सूचना केली आहे. माझे सहकारी त्या-त्या भागात ‘ऑन फिल्ड’ पाहणी करीत असून, नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.