शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी, दि. ५ ऑगस्ट २०२४* :- नदीच्या पुराने दरवर्षी स्थलांतरित व्हावे लागणाऱ्या कुटुंबियांना सततच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याबाबत तोडगा काढू, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरबाधितांना दिले.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरातील पुरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहरात आले होते. सांगवी येथील अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळेत महापालिकेने स्थापित केलेल्या निवारा केंद्रास त्यांनी भेट दिली. यावेळी पूरबाधित नागरिकांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, माजी महापौर माई ढोरे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, उपआयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसदस्य नाना काटे, प्रशांत शितोळे, शंकर जगताप, हर्षल ढोरे, शारदा सोनवणे, सागर अंगोळकर यांच्यासह आपत्कालीन यंत्रणेशी संबंधित अधिकारी कर्मचारी आणि पूरबाधित नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या निवारा केंद्रास भेट देऊन पुरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पुरामूळे दरवर्षी स्थलांतरीत व्हावे लागते या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत त्यांनी नागरिकांना विचारणा केली. यावर नदीकिनारी उंच सीमाभिंत बांधावी असे काही नागरिकांनी सुचविले. तर कायमस्वरूपी सुरक्षित जागी पुनर्वसन करून घरे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली. यावर सर्वंकष विचार करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे तसेच घरांचे पुनर्वसन करण्याबाबतचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरबाधित रहिवाशांना दिले.
महापालिकेच्या निवारा केंद्रात तात्पुरते वास्तव्य करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधताना “भोजनासह इतर सोयीसुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत का ?” असा प्रश्न पुरबाधितांना मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला. त्यावर नागरिकांनी होकारार्थी उत्तर देऊन महापालिकेने आमची चांगली व्यवस्था केल्याचे सांगितले. यावेळी निवारा केंद्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूरबाधित रहिवाशांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, यावेळी महापालिकेने आम्हाला सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून भोजन, पिण्याचे पाणी, ब्लॅकेंट तसेच इतर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे पुरबाधित महिलांनी सांगितले.
‘नदीला आलेल्या पुरामुळे महापालिकेने आम्हाला सुरक्षित निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करून आमच्या मुलाबाळांना आसरा दिला. आज मायबाप सरकारने आमची व्यथा ऐकून घेतली त्यामुळे मायेचा हात पाठीवर फिरवल्यासारखा वाटत असून संकटावर मात करून जगण्याची नवी उमेद निर्माण करून देणारा हा क्षण आहे’, अशी भावना निवारा केंद्रांतील एका महिलेने व्यक्त केली.
पूरस्थितीवर महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा तसेच सोयीसुविधांचा सर्वंकश आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतला. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी अतिवृष्टीच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने पूरबाधित भागात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. यामध्ये आपत्कालीन स्थिती नियंत्रणासाठी मध्यवर्ती आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४X७ (मुख्य इमारत) येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच आपत्कालीन स्थिती नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय ८ आपत्कालीन नियंत्रण कक्ष, पुरबाधितांसाठी निवारा केंद्रे तसेच याठिकाणी भोजनासह आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्कालीन पुर्वसूचना यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याद्वारे दिवसरात्र कार्यरत असणारे आपत्कालीन प्रतिसाद पथक, अतिरिक्त सहाय्य पथके, वैद्यकीय पथके, साफसफाईसाठी आरोग्य यंत्रणा सातत्याने कार्यान्वित ठेवण्यात आली असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त सिंह यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली.