शबनम न्युज : प्रतिनिधी
पिंपरी ; महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रशासक सिंह यांनी विविध विषयांना मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या व महापालिकेच्या हद्दीबाहेर शिक्षण घेणाऱ्या इयत्ता ५ वी टते १० वी च्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पीएमपीएमएल बस चे पास उपलब्ध करून देण्यात येणारी योजना महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याच्या पाससाठी आकारण्यात येणाऱ्या रक्कमेच्या ७५ % रक्कम महापालिका भरणार असून विद्यार्थ्यांना २५ % रक्कम पाससाठी भरावी लागणार आहे.
विशेष बैठकीत मंजूर विषय
१० वी १२ वी च्या मुलींना मोफत डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध करून देणे, मौजे मोशी मधील पुणे नाशिक रस्ता टते वडमुखवाडी शिवेपर्यंतचा ९० मीटर रुंद रस्त्याने बाधित जमिनीचे भूसंपादन करणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इंडस्ट्रीयल स्पोर्ट्स असोसिएशन शुटींगबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना साहित्य पुरविणे, सर्व्हे नंबर २० आणि ९६ येथील शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या पंपहाऊसचे दुरुस्तीविषयक कामे करणे, विविध भागात खोदण्यात आलेल्या चर बुजविणे, विविध भागातील रस्ते, नाले, प्रकल्प तसेच शहरातील विविध ठिकाणच्या देखभाल व दुरुस्तीच्या आदी विषयांना प्रशासक सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.
पूरपरिस्थिती नंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा
आज झालेल्या बैठकित आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील नद्यांना आलेल्या पूर परिस्थिती नंतर क्षेत्रीय कार्यालयस्तरावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. पूर ओसरल्यानंतर पुरबाधित परिसरात तातडीने स्वच्छता करण्यात आली असून, रहिवासी भागात असलेले गाळ धुवून काढण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांवर साचलेले गाळ, केरकचरा काढण्यात आले असून पदपथ, स्मशानभूमी, विसर्जन घाट आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे. शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ४ असे एकूण ३२ रस्ते दुरुस्ती पथक नेमण्यात आले आहेत. तसेच शहरातील रस्ते दुरुस्तीची कार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिली असून आयुक्त सिंह स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहेत.