पद्मभूषण डाॅ.विजय कुमार सारस्वतः ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा स्थापना दिन उत्साहात
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पुणेः विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच नाविण्यपूर्ण व त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणारे शिक्षण देण्याची गरज आहे. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत भर घालणारे व संशोधनास प्रवृत्त करणारे शिक्षण पुरवत असताना, त्यांना सांस्कृतीक मुल्ये देखील पुरवायला हवीत. ज्यातून त्यांच्यात राष्ट्रविषयीचे प्रेम आणि समर्पणाची भावना आपसुकच तयार होईल. एमआयटी एडीटी विद्यापीठ देखील अगदी अशाच प्रकारे शिक्षण देत असल्याने, विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा एमआयटी ब्रँडवरील विश्वास वृद्धींगत होत आहे, असे प्रतिपादन भारतीय निती आयोगाचे सदस्य तथा संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(डीआरडीओचे) माजी चेअरमन पद्मभूषण डाॅ.विजय कुमार सारस्वत यांनी व्यक्त केले. ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या ९व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी, व्यासपीठावर, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ. विरेंद्र शेटे, डाॅ.नचिकेत ठाकूर, डाॅ.विपुल दलाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डाॅ.मंगेश कराड यावेळी म्हणाले, नुकताच माईर्स शिक्षण समुहाने आपला ४२ स्थापना दिन साजरा केला. प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयटी एडीटी विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासावर भर देणारे शिक्षण पुरवत आहे. या विद्यापीठाच्या जडणघडणीत येथील प्रत्येक कर्मचाऱ्याचे बहुमुल्य योगदान आहे. त्यामुळे, भविष्यात विद्यापीठ यशाच्या नव-नव्या शिखरांवर पोचेल याचा विश्वास आहे.
विश्वशांती प्रार्थना सुरुवात तर राष्ट्रगीताने समारोप झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.पुजेरी यांनी तर आभार डाॅ.दुबे यांनी मानले. तर सुत्रसंचलन श्रद्धा वाघटकर व स्वप्नील शिरसाठ यांनी केले.