शबनम न्युज | पिंपरी
चिंचवड मध्ये महिलेच्या दागिन्यांची चोरी केल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे. रक्षाबंधनाच्या सणासाठी पनवेल येथे राहणाऱ्या भावाकडे चिंचवड येथून निघालेल्या बहिणीच्या पर्समधून 3 लाख 90 हजारांचे दागिने आणि एक हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) रोजी जयश्री टॉकीज समोर चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी 73 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे भाऊ पनवेल येथे राहत असून, रक्षाबंधनाच्या सणासाठी त्या चिंचवड येथून पनवेल येथे जाण्यासाठी निघाल्या. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर जयश्री टॉकीज समोर चिंचवड येथे बसची वाट पाहत असताना चोरी झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.