शबनम न्युज | पिंपरी
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या जडणघडणी मध्ये शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे मत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले.
गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनाच्या निमित्तानं अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि मावळ शिक्षक प्रबोधन परिवार यांच्यावतीन आयोजित ‘शिक्षक कृतज्ञता सोहळ्यात’ भोईर बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मावळचे आमदार सुनील शेळके, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, मावळ पंचायती समितीचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत,भगवती ग्रुपचे चेअरमन बाबासाहेब औटी, शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर यांच्या ‘सर्किट हाऊस’ या नाटकाचा प्रयोग शिक्षकांना दाखवण्यात आला. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील शिक्षक मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते.
या सोहळ्यामध्ये मावळ गटविकास अधिकारी सुधीर भागवत, वित्त व लेखा अधिकारी वसुधा भागवत, अभिनेते संजय नार्वेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
भोईर म्हणाले की, नवी पिढी घडवण्याचे सामर्थ्य हे शिक्षकांमध्ये आहे. त्यामुळं आत्ता ज्या काही घटना घडल्यात त्यामुळे शिक्षकांची प्रतिमा डागाळत आहे. यावर शिक्षकांनी विचार करायला हवा. संवाद साधयला हवा, चर्चा करायला हवी.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद तनपुरे, सुहास धस, यांनी केले तर तानाजी शिंदे यांनी आभार मानले.