शबनम न्युज | पुणे
पुण्यात सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ सीडब्ल्यूपीआरएस कॉलनी गेटच्या समोर आज एक धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सागर चव्हाण (वय १८, रा. लक्ष्मी नगर, कोथरूड) हा गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याप्रकरणी हल्ला करणाऱ्या हर्षद संदीप वादळे व धनराज सुनील पाटील या दोन तरुणांना दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुमारे एक महिन्यांपूर्वी इंस्टाग्राम वर मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून सागरला रिक्वेस्ट पाठवली. महिनाभर चॅटिंग केली, काल रात्री बोलणे झाले आणि आज सकाळी खडकवासला परिसरात भेटायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सागर चव्हाण आपल्या एका मित्राला सोबत घेऊन सकाळी लवकर किरकटवाडी फाट्याजवळ येऊन थांबला. ‘तू कधी येते, आम्ही पोहोचतोय,’ असा मेसेज करून करंट लोकेशन पाठवले आणि तिथेच घात झाला. सागर चव्हाण आणि त्याचा मित्र थांबलेले असताना अचानक दुसऱ्या दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून हल्लेखोर आले, एकाने दुचाकीला लाथ मारल्याने सागर खाली पडल्यानंतर त्याच्यावर कोयत्यांनी सपासप वार केले. सागरने हात मध्ये घातल्याने हाताला व डोक्याला गंभीर जखमा झाल्या. सागर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आरोपी दुचाकी घटनास्थळी सोडून किरकटवाडी गावच्या दिशेने फरार झाले.
याप्रसंगी सागर सोबत असलेल्या त्याच्या मित्रावरही गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी मुलीचे नावाने फेक अकाउंट तयार करून सागर चव्हाण यांना जाळ्यात ओढले आणि प्रेमाचे नाटक करून भेटायला बोलावले. हल्ल्यासाठी आणलेले दुचाकी जुनाट असून त्यावर नंबर नाही, यामुळे पूर्ववैमनस्यातून सुनयोजित पद्धतीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.