शबनम न्युज | पिंपरी
“निर्माणशक्ती, संवर्धनशक्ती आणि संहारशक्ती महिलांच्या ठायी उपजतच असतात. आजच्या महिलांना या सुप्त स्त्रीशक्तीची जाणीव करून देणे गरजेचे आहे!” असे प्रतिपादन श्रुतीसागर आश्रम, फुलगाव येथील साध्वी स्थितप्रज्ञानंद महाराज यांनी मंगळवार, ०३ सप्टेंबर २०२४ रोजी करवा धर्मशाळा, आळंदी येथे केले. विश्व हिंदू परिषद स्थापनेच्या षष्ट्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित साध्वी शक्ती संमेलनात स्थितप्रज्ञानंद बोलत होत्या. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख ह. भ. प. माधवदासमहाराज राठी (नाशिक), धार्मिक विभाग क्षेत्र प्रमुख प्रा. संजय मुद्राळे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, साध्वी सरस्वतीदीदी, सह धर्माचार्या प्रमुख ह भ प सुप्रिया साठे, ह. भ. प. सुभाषमहाराज गेठे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील सर्व महिला संत, महंत, महामंडलेश्वर, भागवत कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, धर्माचार्य तसेच सुमारे २४० साध्वी आणि साधक यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी प्रास्ताविक केले. माधवदासमहाराज, प्रा. संजय मुद्राळे, किशोर चव्हाण, ॲड. सतिश गोरडे, सरस्वतीदीदी, सुभाषमहाराज गेठे यांनी आपल्या प्रबोधनपर मनोगतांमधून विविध विषयांवर ऊहापोह केला. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मत्रिशताब्दी, गोंडराणी वीर दुर्गावती यांचे चरित्र आणि कार्य, सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंबप्रबोधन, लवजिहाद समस्या आणि समाधान, मातृशक्ती जागरण, महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण, कुटुंब प्रबोधनाबरोबरच समाज प्रबोधनासाठी प्रबोधनकारांची भूमिका, स्थान, स्वरूप, कार्यक्षेत्र, अपेक्षा आणि समाजाकडून अपेक्षा तसेच महिलांचे राष्ट्रोत्थानातील स्थान, कार्य, सहभाग, संमेलनातून अपेक्षा अशा बाबींवर सविस्तर प्रबोधन, चर्चा आणि मंथन करण्यात आले.
साध्वी स्थितप्रज्ञानंद महाराज पुढे म्हणाल्या की, “वेदांमध्ये ‘मातृदेवो भव:’ असे सर्वात प्रथम उद्धृत करीत आई ही मानवी जीवनातील पहिली गुरू असते, असे नमूद करून एक दिवसाच्या अर्भकाला आयुष्यभर घडविण्याची जबाबदारी आईची असते, असे अधोरेखित केले आहे. त्यामुळे उंबरठ्याच्या आत आणि बाहेर सर्व ठिकाणी ज्ञान देणारी आई ही आद्यगुरू आहे. आज कुटुंबसंस्था, विवाहसंस्था मोडकळीस येत असून आपल्या उदात्त परंपरा आणि संस्कृतीचे जतन अन् संवर्धन करण्याची वेळ आली आहे. आपल्या परंपरांमागील शास्त्र समाजाला पुन्हा शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे. संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणायचे असेल तर सर्व भेद मिटवून कौटुंबिक पातळीवर प्रबोधन करून धर्मांतराचे आव्हान थोपविले पाहिजे!”
धर्माचार्य सहसंपर्क प्रमुख नागनाथ बोंगरगे, गणेश गरुड, विनायक पितळे, ॲड. मृणालिनी पडवळ, संजय कुलकर्णी, प्रिया रसाळ, सोनाली नाथ, डॉ. शर्वरी येरगट्टीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. ह. भ. प. सुप्रिया साठे यांनी सूत्रसंचालन केले.