शबनम न्यूज: प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही ३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये विविध क्रीडा स्पर्धांची रेलचेल असणार आहे. यामध्ये पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंट, बॉक्सिंग स्पर्धा, मल्लखांब स्पर्धा, डर्ट ट्रॅक रेस स्पर्धा यांचा यात समावेश आहे.
गोल्फ स्पर्धा : पुणे फेस्टिव्हल पूना क्लब गोल्फ टूर्नामेंट रविवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वा. येरवडा गोल्फ क्लब येथे सुरू होत असून, याचे आयोजन पूना क्लबने केले आहे. याचा बक्षीस वितरण समारंभ दुपारी १२.३० वा. पार पडेल. यामध्ये स्टेबलफोर्ड फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा होणार आहे. गोल्ड डिव्हिजन, सिल्व्हर डिव्हिजन, लाँगेस्ट ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, नियुरेस्ट टू पिन अशी बक्षिसे व रोलिंग ट्रॉफी आयोजकांकडून दिली जाईल. यंदा १०० हून अधिक स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे संयोजन पूना क्लबने केले आहे.
बॉक्सिंग स्पर्धा : दरवर्षीप्रमाणे पुरुष आणि महिला बॉक्सिंग स्पर्धा शनिवार, दि. १४ सप्टेंबर या दिवशी पुण्यातील भवानी पेठ, येथील वस्ताद लहुजी साळवे स्टेडियम येथे संपूर्ण दिवसभर चालू राहतील. यात एकूण पुरुष व महिला गटांत प्रत्येकी ४० स्पर्धक असून, विविध वजन गटांतील स्पर्धक भाग घेतील. या स्पर्धा जिल्हास्तरीय असून, पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या आहेत. माजी राज्यमंत्री रमेश बागवे व माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी याचे आयोजन केले आहे.
मल्लखांब स्पर्धा : पुण्याच्या टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळ येथे बुधवार, दि. ११ सप्टेंबर व गुरुवार, दि. १२ सप्टेंबर या दोन दिवशी महाराष्ट्र मंडळातर्फे १५ वर्षांखालील विविध वयोगटांतील मुले व मुली, स्पर्धकांसाठी पुरलेल्या मल्लखांबावर व रोपवर मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ४००हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला असून, विविध वयोगटांतील पहिल्या २ विजेत्यांना पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्र मंडळाचे अभिजित भोसले व सचिन परदेशी यांनी याचे आयोजन केले आहे.
द डर्ट ट्रॅक रेस : पुण्याच्या कोंढवा येथील पुणे महानगरपालिकेच्या ग्राऊंडमध्ये पुणे फेस्टिव्हल डर्ट ट्रॅक रेसचे आयोजन रविवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० पासून संपूर्ण दिवसभर होणार आहे.ही स्पर्धा विविध गटांत होणार असून, पुणे जिल्ह्यातील १०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. ‘ऑटोमोटिव्ह रेसिंग मोटरस्पोर्ट्स’तर्फे याचे आयोजन करण्यात आले असून, फेडरेशन ऑफ मोटर्स स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया यांनी या स्पर्धेस मान्यता दिली आहे. यामध्ये नोविस क्लास, मॉडिफाइड बाइक्स १२५ cc, २५०cc, ३५०cc महिला गट व स्कूटर गट आहेत. स्पर्धेचे बक्षीस वितरण त्या दिवशी सायंकाळी ५ वाजता संपन्न होईल.
पुणे फेस्टिव्हलचे मुख्य क्रीडा समन्वयक प्रसन्न गोखले आहेत .
३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचलनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील, सुमा शिल्प लि., भारत फोर्ज आणि नॅशनल एग्ज को–ऑर्डीनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी.वाय. पाटील युनिवर्सिटी, बढेकर ग्रुप, अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्युट हे उपप्रायोजक आहेत.