शबनम न्यूज: प्रतिनिधी
पुणे : भोंगा वाजलाय…, तुझ्या गावावरून तुला चोरून पाहीन मी…, माय बाप लेक घराण्याची लाज, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…” यांसारख्या बहारदार व हृदयस्पर्शी कवितांच्या सादरीकरणातून प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी लांडेवाडी येथील श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’ फेम कवी अनंत राऊत यांच्या कवितांनी महाराष्ट्रातील रसिकांना भुरळ घातली आहे. त्याची झलक लांडेवाडी येथील शिवाजीराव आढळराव पाटील प्रेक्षागृहात दिसून आली.
श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, पुणे म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या संकल्पनेतून संस्थेमध्ये दरवर्षी शिक्षकांसाठी अनेक दर्जेदार कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन केले जाते. दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिवाजीराव पाटील प्रेक्षागृहात काव्यसंध्या हा विशेष कार्यक्रम रंगला, तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात कवी अनंत राऊत यांनी अनेक विषयांना हास्य कविता अन नानाविविध अनुभवांच्या माध्यमातून हात घालत सर्व शिक्षक वृंदास मंत्रमुग्ध केले. विविध राजकीय व सामाजिक विषयांवर आपल्या खास विनोदी शैलीमध्ये त्यांनी भाष्य करून आजच्या युगातील शिक्षकांवर समाज परिवर्तनाची खुप मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करून चांगला माणूस घडविण्याचे कार्य शिक्षकांनी करावे असा सल्ला दिला.
चौकट:- ‘शिक्षक दिन’ हा दिवस केवळ आपल्या शिक्षकांचे योगदान ओळखण्याचा नाही तर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देखील आहे. आपली संस्था महाराष्ट्रात नामांकित संस्था म्हणुन उभी आहे, ‘या संस्थेचा डोलारा उभा आहे, तो माझ्या संस्थेतील शिक्षकांमुळेच’ असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक राजू आढळराव यांनी केले तर न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी संस्था गीत सादर केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. कल्पनाताई आढळराव पाटील, प्रशासनअधिकारी सौ. शामल चौधरी, शिवाजीराव द आढळराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक राजू आढळराव, न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ.शबनम मोमीन, उपप्राचार्या रजनी बाणखेले, भीमाशंकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.संजय चौधरी, आढळराव पाटील इन्स्टिट्युूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे डायरेक्टर विश्वजीत थिगळे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व विभागातील शिक्षक वृंद, डॉ. मोहन साळी, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले, कैलासबुवा काळे, शिवाजी राजगुरू, सागर काजळे, संतोष डोके, सचिन बांगर, प्रवीण थोरात, प्रशांत काळे, राजाभाऊ काळे, सोमनाथ काळे, राजेश काळे, मालती थोरात आदी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक महादेव गायकवाड यांनी केले.