पुणे : ३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. 8 ते 16 सप्टेंबर या काळात विविध सांस्कृतिक उपक्रमांची मालिका सजणार आहे. यामध्ये केरळ महोत्सव, उगवते तारे व इंद्रधनु, भारत मेरा रंगरंगीला कार्यक्रम, मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, मराठी कविसंमेलन, ग.दि.मा. व सुधीर फडकेंची गाणी, ऑर्केस्ट्रा, अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित गाणी व नृत्य, महिलांची नृत्य स्पर्धा, व्हाइस ऑफ पुणे फेस्टिव्हल आणि पुणे फेस्टिव्हल करंडक स्पर्धा, पुण्यातील ९ शाळांमधील विद्यार्थ्यांचे नृत्य आदींसोबतच प्रख्यात पार्श्वगायक मोहम्मद रफी, संगीतकार मदनमोहन, अभिनेते राज कपूर व गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘लिजंट्स ऑफ बॉलीवूड’ हा गीत व नृत्य कार्यक्रम, भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले अभंग, गण-गवळण, नाट्यसंगीत, गझल, भावगीत व सिनेसंगीत आणि नृत्य यांचा ‘अविष्कार भारती’ कार्यक्रम, रोटरी क्लबच्या सदस्यांनी सादर केलेला ‘रोटरीचे इंद्रधनु’ कार्यक्रम आणि सदाबहार लावणी अशा अनेक मनोहारी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड आणि बालगंधर्व सांस्कृतिक कार्यक्रमप्रमुख मोहन टिल्लू यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पर्यटन संचलनालयाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका सौ. शमा पवार व सर्व कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजक उपस्थित होते. अतुल गोंजारी व श्रीकांत कांबळे हे बालगंधर्व रंगमंदिरातील या कार्यक्रमांचे व्यवस्थापन सांभाळत आहेत.
यासोबतच बालगंधर्व कलादालनात पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शन आणि पुण्याच्या पर्यटनाबाबत विशेष परिसंवाददेखील आयोजित करण्यात आला आहे.
तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदमध्ये नारदीय कीर्तन महोत्सव आणि केसरी वाड्यातील लोकमान्य सभागृहात ५० फूट x ३ फूट कॅन्व्हासवर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची चितारलेली पेंटिंग्ज हे देखील आकर्षण असतील.
केरळ महोत्सव – पुणे जिल्ह्यातील केरळवासीयांच्या ‘पुणे मल्याळी फेडरेशन’तर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘केरळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. केरळची संस्कृती व धार्मिक सलोखा यांचे मनोहारी दर्शन २०० कलावंत विविध समूह नृत्याविष्कारातून सादर करतील. केरळचे प्रख्यात मल्याळी अभिनेते देवन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. पुणे मल्याळी फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजन नायर यांनी याचे आयोजन केले असून, बाबू नायर समन्वयक आहेत.
उगवते तारे व इंद्रधनु – ५ ते १२ वर्षे वयोगटातील उगवते आणि १३ ते २० वर्षे वयोगटातील नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ असणारा ‘उगवते तारे व इंद्रधनु’ कार्यक्रम सोमवार, दि. ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता ‘उगवते तारे’ व सायंकाळी ५.३० वाजता ‘इंद्रधनु’ बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर होतील. यामध्ये २०० हून अधिक बाल व युवा कलाकारांनी भाग घेतला आहे. शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, वाद्यवादन, बॉलीवूड संगीत व पाश्चिमात्य डान्स असे विविध कलाप्रकार बाल व युवा कलाकार सादर करतील. सुप्रिया ताम्हाणे, हर्षद लिमये व गौरी गोळे लिमये यांनी याचे संयोजन केले आहे.
भारत मेरा रंगरंगीला – भारतातील विविध राज्यांमधील संस्कृतींचे विलोभनीय दर्शन, गीत व नृत्यातून साकारणारा ‘भारत मेरा रंगरंगीला’ हा कार्यक्रम सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होईल. यामध्ये काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, आसाम, बंगाल, राजस्थान, केरळ, गुजरात, महाराष्ट्र, अशा विविध राज्यांतील संस्कृतींचे संगीत व नृत्यातून दर्शन घडवत आपल्या वीर जवानांना मानवंदना देत हा कार्यक्रम संपन्न होईल. याचे लेखन यतिन कदम यांनी केले असून, नृत्य कलामंदिरच्या विद्यार्थिनी नृत्याविष्कार सादर करतील. याची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन तेजश्री अडिगे यांनी केले आहे.
सदाबहार मराठी कवी संमेलन – दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘हास्यधारा’ हे मराठी कवी संमेलन गुरुवार, दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होत असून, याचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे करणार आहेत. त्यामध्ये शरद धनगर (अमळनेर), आबिद शेख (पुसद), अंजली ढमाळ, वैशाली पतंगे (पुणे), म. बा. चव्हाण (पुणे), नितीन देशमुख (चांदुरबाजार), नारायण पुरी (नांदेड), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी ), वि. दा. पिंगळे (पुणे), विजय पोहनेरकर (छत्रपती संभाजीनगर) हे कवी सहभागी होणार आहेत. आचार्य अत्रे यांच्या १२५व्या जयंतीवर्षानिमित्त काही विडंबन कविता देखील हे कवी सादर करतील.
‘गाणी बाबूजी-गदिमांची’ – ‘स्वरोमा म्युझिकल इव्हेंट्स’ प्रस्तुत आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या सहकार्याने ‘गाणी बाबूजी-गदिमांची’ हा कार्यक्रम दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर होणार आहे. प्रसिद्ध गायक हृषीकेश रानडे, अनुपमा कुलकर्णी, राजेश दातार आणि प्रज्ञा देशपांडे गाणी सादर करणार असून, हार्मोनियमवर प्रसन्न बाम, तबल्यावर अभिजित जायदे, सिंथेसायजरवर अमन सय्यद आणि रशीद शेख, ऱ्हिदम मशीन आणि ढोलकीवर रोहित साने साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन सिद्धार्थ बेंद्रे करणार असून, संयोजन करुणा पाटील यांचे आहे.
तुझ्यात जीव रंगला – सदाबहार लावणीचा ‘तुझ्यात जीव रंगला’ हा कार्यक्रम सोमवार १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होईल. नृत्यांगना अर्चना जावळेकर, संगीता लाखे, किरण पुणेकर, प्राची मुंबईकर आणि नमिता पाटील सहकलावंतांसमवेत लावणीच्या ठेक्यावर आपली नृत्यकला सादर करतील. याचे संयोजन शशिकांत कोठावळे यांनी केले आहे.
मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा – विवाहित महिलांचे व्यक्तिमत्त्व आणि गुण यांवर आधारित ‘मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा’ शनिवार, दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होत आहे. २१ ते ४० आणि ४१ ते ५५ वर्षे या दोन वयोगटांतील २००हून अधिक विवाहित महिलांनी यात सहभाग घेतला. प्राथमिक फेरीनंतर दोन गटांत प्रत्येकी १२ विवाहित महिलांची निवड करण्यात आली. प्राथमिक फेरीत परीक्षक म्हणून टीव्ही अभिनेत्री मधुरा वाघ, मिसेस इंडिया फेस ऑफ वेस्ट रचना खाणेकर व मिसेस इंडिया सारिका शेठ यांनी काम केले. अंतिम फेरीसाठी या सर्व स्पर्धक महिलांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. याचे समन्वयक अमृता जगधने आणि सहसमन्वयक अर्चना सोनावणे आहेत.
महिलांची नृत्य स्पर्धा – ‘नृत्य झंकार’ ही महिलांसाठीची नृत्य स्पर्धा रविवार, दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होईल. समूह नृत्य गटात स्पर्धा आयोजित केली असून, २३० युवती व महिलांनी यात सहभाग घेतला आहे. संयोगिता कुदळे यांनी याचे संयोजन केले आहे.
आम्रपाली – प्रख्यात अभिनेत्री पद्मविभूषण वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित हिंदी चित्रपट गीते व नृत्य यांचा ‘आम्रपाली’ हा कार्यक्रम रविवार, दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होईल. ज्येष्ठ गायिका गीतांजली जेधे, हिंमतकुमार पंड्या आणि प्रज्ञा खरात या गायकांसमवेत नृत्यांगना रमा वाळिंबे आणि स्वाती धोकटे या १० वादक कलाकारांसह नृत्य सादर करतील. प्रख्यात गायिका गीतांजली जेधे यांनी याचे संयोजन केले आहे.
लिजंट्स ऑफ बॉलीवूड – ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी, ज्येष्ठ संगीतकार मदनमोहन, ज्येष्ठ अभिनेते राज कपूर व गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली वाहणारा त्यांच्या गाण्यांवर आधारित ‘लिजंट्स ऑफ बॉलीवूड’ हा कार्यक्रम शनिवार, दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता सादर होईल. यामध्ये मनीषा निश्चल आणि मकरंद पाटणकर हे कलाकर असून, मनीष गोखले निवेदन करणार आहेत. पायलवृंद आणि महक पुणेतर्फे याचे आयोजन करण्यात आले असून, याची निर्मिती निकिता मोघे व मनीषा निश्चल यांनी केली आहे.
व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल व करंडक – युवकांचे हक्काचे व्यासपीठ बनलेला ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल’ कार्यक्रम रविवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सायं. ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होईल. त्याच वेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या गायन स्पर्धेसाठी ‘पुणे फेस्टिव्हल करंडक’ या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धेत ४० वर्षांखालील स्त्री-पुरुष आणि ४० वर्षांवरील स्त्री-पुरुष असे दोन गट असून, एकूण दीडशे स्पर्धकांनी यात सहभाग घेतला आहे. यांतील २५ स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले जातील. दोन्ही गटांत सर्वोत्कृष्ट गायकास पुरस्कार दिले जातील. ‘पुणे फेस्टिव्हल करंडक’ स्पर्धेत १० महाविद्यालयांनी सहभाग घेतला असून, अंतिम फेरीसाठी तीन महाविद्यालयांची निवड करण्यात येईल. याचे संयोजन अनुराधा भारती यांनी केले आहे.
रॉकिंग 90s – १९९० ते १९९९ या काळातील गाजलेल्या चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम गुरवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होईल. यामध्ये ए. आर. रहमान, आनंद-मिलिंद, जतिन-ललित, नदीम-श्रवण, बप्पी लाहिरी यांनी संगीत दिलेली आणि लता मंगेशकर, कुमार सानू, अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती, के. चित्रा, उदित नारायण, सोनू निगम यांनी गायलेली सुमधुर गाणी सादर केली जातील. यामध्ये प्रख्यात गायिका श्रद्धा गायकवाड, सौरभ शर्मा, अद्वैत लेले, उमेश कुलकर्णी, संदीप अवघडे, अभिनव रंगनाथन तसेच चारू श्रीनिवास, स्वाती दुबे, लीना काळे, माधुरी लेंडे आणि डॉ. परिमल नांदोडे हे गायक सहभाग घेतील. याचे सूत्रसंचालन निराली मांकड करणार असून राष्ट्रीय कीर्तीचे वादक वाद्यसंगत करतील. याची संकल्पना व दिग्दर्शन प्रख्यात गायिका श्रद्धा गायकवाड यांनी केले आहे.
अविष्कार भारती – भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांन तर्फे शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे अभंग, गण-गवळण, नाट्यसंगीत, गझल, भावगीत, मराठी-हिंदी सिनेसंगीत याबरोबरच कथ्थक, भरतनाट्यम आणि सत्रिय समूहनृत्य सादर होईल. यामध्ये गायक सुरंजन व शुभम खंडाळकर, नंदिनी व अंजली गायकवाड असून, कथ्थक, भरतनाट्यम् व सत्रिय या नृत्यप्रकारांतील गुरू पं. मनीषा साठे, गुरू डॉ. सुचेता चापेकर, गुरू अरुंधती पटवर्धन, गुरू डॉ. स्वाती दैठणकर, गुरू पं. शमा भाटे आणि डॉ. देविका बोरठाकूर यांच्याकडे शिकणाऱ्या भारती विद्यापीठातील विद्यार्थिनी हा कार्यक्रम सादर करतील. याचे संयोजन प्रा. शारंगधर साठे यांनी केले आहे.
रोटरीचे इंद्रधनु – हा कार्यक्रम सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होईल. रोटरीमधील विविध उद्योजक एकत्र येऊन आपल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी पहिल्यांदाच पुणे फेस्टिवलच्या व्यासपीठावर येणार आहेत. यामध्ये अनेक नामवंत रोटरीयन्स आपली गाणी, समूहनृत्य, वादन, मिमिक्री, समाजप्रबोधन अशा विविध गोष्टींमधून आपली कला सादर करतील.
शाळांचे समूह नृत्य – पुण्यातील विविध ९ शाळांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सादर केलेले वेगवेगळे समूहनृत्य हा सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होईल. यामध्ये सिंबॉयसिस, रेणुका स्वरूप प्रशाला, न्यू इंग्लिश स्कूल (रमणबाग), भारती विद्यापीठ, सरहद स्कूल, जिजामाता गर्ल्स हायस्कूल, सरहद ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, महावीर प्रतिष्ठान आणि मातोश्री इंटरनॅशनल स्कूल (वारजे) या शाळांनी सहभाग घेतला आहे. याचे समन्वयक म्हणून अॅड. सचिन हिंगणेकर यांनी काम पाहिले आहे.
३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचलनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील, सुमा शिल्प लि., भारत फोर्ज आणि नॅशनल एग्ज को–ऑर्डीनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी.वाय. पाटील युनिवर्सिटी, बढेकर ग्रुप, अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्युट हे उपप्रायोजक आहेत.