शबनम न्यूज: प्रतिनिधी
पुणे : ३६व्या पुणे फेस्टिव्हलअंतर्गत उगवत्या व नवोदित कलाकारांसाठी ‘उगवते तारे’ व ‘इंद्रधनु’ कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे सोमवार, दि. ९ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. त्यात ३००हून अधिक बाल व युवा कलाकारांनी सहभाग घेतला. शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्यामध्ये कथ्थक, भरतनाट्यम्, मोहिनीअट्टम, कथकली, कुचीपुडी व ओडिसी नृत्य, तसेच तबला, बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलिन, सतार, सरोद, की-बोर्ड वादन, सिंथेसायजर, गंधर्व गायन, नकला, एकपात्री प्रयोग, पोवाडे, भावगीत, भक्तिगीत, चित्रपट गीते, सुगम संगीत, बॉलीवूड नृत्य, पाश्चिमात्य नृत्य असे कलाप्रकार बाल व युवा कलाकारांनी सादर केले आणि उपस्थित प्रेक्षकांनी बाल व युवा कलाकारांना मोठा प्रतिसाद देत वाहवा केली.
अभिनेत्री श्रुती उबाळे, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, समन्वयक सुप्रिया ताम्हाणे व हर्षद लिमये, नृत्य स्पर्धा समन्वयक संयोगिता कुदळे व अतुल गोंजारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदांती राव यांनी सूत्रसंचालन केले. ५ ते १२ वर्षे वयोगटातील उगवते कलाकार व १३ ते २० वर्षे वयोगटातील युवा कलाकार यांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या पुणे फेस्टिव्हलमधील या कार्यक्रमाचे यंदा २७वे वर्ष आहे.
३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचलनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील, सुमा शिल्प लि., भारत फोर्ज आणि नॅशनल एग्ज को–ऑर्डीनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी.वाय. पाटील युनिवर्सिटी, बढेकर ग्रुप ,अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्युट हे उपप्रायोजक आहेत.