शबनम न्यूज: प्रतिनिधी
पुणे ; तब्बल ५० फुट लांब आणि ३ फुट रुंद अश्या कॅन्व्हासवर २५ महिला चित्रकारांनी महाष्ट्रातील विविध पर्यटनस्थळे रंगवून पुणे फेस्टिव्हलमध्ये अनोखा उपक्रम साजरा केला. लोकमान्य सभागृह, केसरी वाडा, पुणे येथे संपन्न झालेल्या या उपक्रमात देशातील महिला चित्रकारांच्या आकृती ग्रुपच्या ३२ महिला चित्रकार सहभागी झाल्या होत्या. या कॅन्व्हासवर कोकण किनारपट्टी, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, १२ ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातले गड – किल्ले, वनसंपदा, महाराष्ट्रातील काही प्रमुख मंदिरे, अटल सेतू इत्यादी पर्यटनस्थळे महिला चित्रकारांनी साकारली. कॅन्व्हासवर अॅक्रेलिक कलर, वॉटर कलर्स, खडू, पेन्सिल, कोळसा इत्यादी माध्यमातून पेंटिंग्ज रंगवली गेली.
५० फुट लांबीच्या या अनोख्या पेंटीगचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन व महिला चित्रकारांचा सत्कार होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाच्या संचलनालयाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका सौ. शमा पवार, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचे प्रमुख किरण ठाकूर , डॉ. प्रणिती रोहित टिळक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. हे कॅनव्हास पेंटिंग दि. १० रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळात प्रेक्षकांसाठी विनामुल्य खुले असेल.
यासाठी लागणारे कॅनव्हास रोल, रंग, ब्रशेस, एप्रन इत्यादी सर्व साहित्य फेविक्रील (पिडिलाईट इंडिया) पुणे शाखा यांच्याकडून उपलब्ध झाले. त्याचप्रमाणे फेविक्रीलकडून संपूर्ण सभागृह डेकोरेशन केले गेले.
पर्यटननगरी बनलेल्या पुणे शहरात अधिकाधिक देशी-परदेशी पर्यटक पुण्यात यावेत व पुण्याचे ब्रॅडींग जगभर व्हावे यासाठी, पुणे फेस्टिव्हलतर्फे महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या सहयोगातून अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. त्यातीलच हा उपक्रम आहे. असे याच्या समन्वयक आकृती ग्रुपच्या अॅड. अनुराधा भारती यांनी सांगितले.
३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचलनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील, सुमा शिल्प लि., भारत फोर्ज आणि नॅशनल एग्ज को–ऑर्डीनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी. वाय. पाटील युनिवर्सिटी, बढेकर ग्रुप ,अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्युट हे उपप्रायोजक आहेत.