प्रतिनिधी | गजाला सय्यद
शबनम न्युज | पुणे
संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य हे लौकिक राज्य आहे. मात्र आता महाराष्ट्राची दुर्दैवी अवस्था झाली आहे. राज्याचा एकूण विचार करता राज्य आर्थिक अडचणीत आहे. यामध्ये तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे अयोग्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र व्हिजन २०५०’ या विषयावर बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
“राज्याचा एकूण विचार करता राज्य आर्थिक अडचणीत आहे. तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे अयोग्य आहे. येत्या काळात सहकारी कर्मचाऱ्यांचा पगारही करता आला नाही तर आश्चर्य वाटायला नको, महाराष्ट्र समोरील आर्थिक सामाजिक तसेच अन्य अनेक विषयावरील आव्हाने उलगडत आहे, त्यांचा सामना येत्या काळात करावा लागेल. तसेच आपल्या देशात प्रगती बरोबर वाहतूक आव्हान याचे व्यवस्थापन करणे देखील देशासाठी आव्हानात्मक आहे.”
ते म्हणाले, राज्याची स्थापना झाली, त्यावेळी दूरदृष्टी असणारे यशवंतराव चव्हाण यांच्याकडे नेतृत्व होते. त्यांनी अनेक निर्णय घेतले व त्यामुळे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा जलद विकास झाला. भौगोलिक दृष्टीत राज्याला असलेले महत्त्व व सामाजिक सौहार्द यामुळे ते शक्य झाले. आता देशातील अनेक राज्यांमध्ये विमानतळ झाले, बंदरे झाले, रस्ते तयार झाले. त्यामुळे आता स्पर्धा आहे. म्हणूनच राज्याला राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा सर्व स्तरांवर गंभीरपणे वाटचाल करायला हवी, तसे होताना दिसत नाही. तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे सामाजिक सौहार्द, विरोध करणारी वक्तव्य सातत्याने होणे, निवडून आल्यानंतर पक्षांतर होणे, अशा गोष्टी होत आहे.
याप्रसंगी, राज्यात वाढत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न यावर आपले पक्ष उपाययोजना म्हणून काय भूमिका मांडतोय? असे प्रश्न आमच्या प्रतिनिधींनी जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी आमचा पक्ष प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या राज्यात शेतकऱ्यांना शेती विषयक विविध समस्या आहेत. शेतकऱ्यांना आत्मविश्वास पाहिजे की, माझे सरकार मला योजनेमार्फत मदत करेल.
तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, परंतु सरकार सरसकट सर्वांनाच पैसे वाटप करीत आहे. आमचे असे म्हणणे आहे की, ज्यांना खूपच गरज आहे, ज्यांना मदतीची गरज आहे त्याच महिलांना पैसे वाटप करण्यात यावे.
त्यांच्या समवेत व्यासपीठावर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी जाधव यांनी केले तर प्रस्तावना सुनीत भावे यांनी केली.