पुणे: पश्चिम बंगालमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचार असो की, बदलापूर येथील चिमुकलीवरील अन्याय असो, महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी, महिलांवरील अन्यायाविरोधात जागृती करण्यासाठी सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या (एसएलसी) वतीने बावधन परिसरात शांतता मोर्चा काढण्यात आला. सुर्यदत्त विधी महाविद्यालयापासून एनडीए रोडपर्यंत आणि पुन्हा बवधनमध्ये बॅनर आणि पोस्टर्स हातात घेऊन हा मोर्चा निघाला. महिला सुरक्षा आणि संरक्षणाबद्दलची आपली तीव्र चिंता आणि संवेदनशीलता व्यक्त करण्यासाठी आणि पीडित महिलेप्रती ऐक्य दर्शवण्यासाठी हा मोर्चा होता.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या शांतता मोर्चामध्ये ‘एसएलसी’ आणि सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीचे (एससीएमआयआरटी) प्राचार्य, सर्व शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. या संवेदनशील घटनांवर आवाज उठविण्यासाठी नैतिक, सामाजिक आणि मानवतेची जबाबदारी म्हणून या सर्व सहभागींनी निषेध नोंदवला. डॉ. मोनिका सेहरावत यांच्या पुढाकारात डॉ. मंकुराणी गोयल, केतकी बापट, विजयदीप, निलेश, सुप्रिया सिरसाट, आंशिका जोशी, तेजल निकम व सहकाऱ्यांनी मोर्चाचे यशस्वी संयोजन केले. हिंजवडी पोलिस स्टेशनने सुरक्षित वाहतूक व्यवस्था पुरवली होती.
एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर लोकांची मते व्यक्त होतात. पश्चिम बंगाल आणि बदलापूर येथील घटनेने संपूर्ण भारताला हादरवून टाकले आहे. या क्रूर, अमानवीय घटनांनंतर महिलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आपण कुठे कमी पडलो याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. सूर्यदत्तमध्ये नेहमी स्त्री-पुरुष समानता आणि महिलांचा सन्मान याचा संस्कार दिला जातो. आज समाजामध्ये महिलांचा सन्मान करण्यास शिकवण्याची गरज भासू लागली आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली, तर अशा घटनांना आळाबसेल, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.