शबनम न्युज | पुणे
विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान शिकतानाच भारतीय ज्ञान परंपरेची प्रासंगिकता आणि त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे असे आवाहन भारतीय ज्ञान परंपरा आणि भगवद्गीतेच्या अभ्यासक रोमा अभ्यंकर यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मध्ये भारतीय ज्ञान परंपरा या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेतील ग्रंथामध्ये सांगितलेले तत्वज्ञान हे आजही कशाप्रकारे सुसंसगत ठरत आहे, आणि त्याचा यथायोग्य वापर केल्यास आपली सध्याची कार्यसंस्कृती आणि नैतिकता अधिक सक्षम होऊ शकते असा विश्वास रोमा अभ्यंकर यांनी वक्त केला.
शिक्षण, प्रशासन, विज्ञान आणि व्यवस्थापन या सारख्या आधुनिक क्षेत्राला भारतीय ज्ञान परंपरा कशाप्रकारे सहाय्यभूत होऊ शकते याबद्दल रोमा अभ्यंकर यांनी भगवद्गीता आणि अन्य ग्रंथांमधील उदाहरणांचे दाखले देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक विकासाचे योग्य संतुलन भारतीय ज्ञान परंपरेत दिसून येते असे रोमा अभ्यंकर यावेळी म्हणाल्या. भगवद्गीतेतील कर्मयोग,तात्विक शिकवण आणि व्यावहारिक शहाणिवेचा सखोल अभ्यास करून त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात निर्णय क्षमतेशी कशा प्रकारे सांगड घालता येईल यादृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील व्हावे असेही त्या म्हणाल्या.
संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी रोमा अभ्यंकर यांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू सांगितला. संस्थेच्या आयक्यूएसी समन्वयक आणि एमबीए विभाग प्रमुख डॉ. वंदना मोहंती यांनी रोमा अभ्यंकर यांचा सत्कार केला. व्याख्यानाचे स्वरूप संवादात्मक असल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये विशेष उत्साह दिसून आला. या व्याख्यान सत्रासाठी एमबीए आणि एमसीए चे सुमारे ११५ विद्यार्थी, सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मधुरा देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.युगंधरा पाटील यांनी केले.