शबनम न्युज | पिंपरी
संघर्षमय जीवनात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दिव्यांग खेळाडूंनी यशस्वी जीवनाचे उद्दिष्ट खेळाच्या माध्यमातून साध्य केले आहे. पॅराऑलिंपिकसारख्या विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्येदेखील या खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. महापालिकेने पॅरा टार्गेट शुटींग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या पुणे जिल्हास्तरीय पॅरानेमबाजी स्पर्धेच्या माध्यमातून अशा खेळाडूंना प्रोत्साहन मिळून त्या माध्यमातून निश्चितपणे नवोदित खेळाडू घडतील, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पॅरा टार्गेट शुटींग असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली पुणे जिल्हास्तरीय पॅरानेमबाजी स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, चिंचवड येथे ११ ते १४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते उत्साहाच्या वातावरणात दिमाखात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या उद्घाटन समारंभास मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, पुणे पॅरा टार्गेट शुटींग असोसिएशनचे अध्यक्ष रफिक खान तसेच प्रशिक्षक अरूण पाडाळे, महापालिका कर्मचारी, दिव्यांग खेळाडू आणि शहरातील विविध दिव्यांग संघटनांचे प्रमुख पदाधिकारी तसेच प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, दिव्यांग खेळाडूंना क्रीडाविषयक सोयीसुविधा तसेच योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण लाभले तर ते देशाचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच उज्ज्वल करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग खेळाडूंना सोयीसुविधा पुरविण्यामध्ये तसेच त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे. यामध्ये आणखी सुधारणा करण्यावर तसेच आधिकाधिक दिव्यांग खेळाडूंना अशा स्पर्धांमध्ये सामिल करून घेण्यावर भर दिला जात आहे, जेणेकरून त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल. भविष्यातही दिव्यांग खेळाडूंच्या जगण्याला एक उद्दिष्ट मिळावे आणि त्यांच्यातील स्वाभिमान जागृत व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने विविध पॅरालिंपीक स्पर्धांचे आयोजन केले जाईल.
यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि इतर अधिकारी यांनी प्रातिनिधीक स्वरूपात नेमबाजी हा खेळ खेळून स्पर्धेची सुरूवात केली. तसेच उपस्थित दिव्यांग खेळाडूंशी चर्चा करून त्यांच्या मागण्या, अडचणी आणि शंका जाणून घेतल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांनी मानले आणि सूत्रसंचालन श्रद्धा राऊत यांनी केले.